बकालपणाला जबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ व जुईनगर पश्चिमेला अनधिकृत बॅनरमुळे ठिकठिकाणी बकालपणा आला असून महापालिका प्रशासनाच्या उत्पन्नातही घट येवू लागली आहे. अनधिकृत बॅनर तात्काळ हटविण्यात व अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास नेरूळ विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उदासिनता व अकार्यक्षमता दाखविली जात आहे. अनधिकृत बॅनरमुळे नेरूळ व जुईनगरच्या पश्चिमेला बकालपणा येत असल्याने महापालिका प्रशासनाने विभाग कार्यालयातील अतिक्रमणच्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता रहीवाशांकडून करण्यात येवू लागली आहे.
जुईनगर रेल्वे स्टेशनपासून ते नेरूळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या पश्चिमेकडील स्टेशन रोडवर जुईनगर रेल्वे स्टेशनबाहेरील नाल्यालगतचे रिक्षा स्टॅण्ड, रेल्वे फाटक,पेट्रोलपंपानजिकचा चौक, सिडको गृहनिर्माण सोसायट्यांबाहेरील पदपथ, राजीव गांधी उड्डाणपुलाखालील चौक, एल मार्केटचा चौक, साईबाबा हॉटेल चौक, एलआयजीमधील चौक, नेरूळ रेल्वे स्टेशन बाहेरील परिसर, तेरणा हॉस्पिटल, श्रीगणेश सोसायटी ते नेरूळ जिमखाना परिसर, नेरूळ सेक्टर २४ मधील ए टाईप इमारतींकडे जाणारा चौक, वजरानी स्पोर्टस क्लबच्या बाहेरील भाग, नेरूळ सेक्टर १८ चा चौक, अंर्तगत भागातील रस्ते, कुकशेत गावातील प्रवेशद्वार, रामलीला मैदानाबाहेरील भाग, सारसोळे बसडेपो, समाधान चौक, राजीव गांधी उड्डाणपुलाजवळील सेक्टर चारमधील चौक, सारसोळे गावातील बुध्या बाळ्या वैती मार्ग, नेरूळ सेक्टर सहामधील सुश्रुषाकडे वळसा मारणारा चौक,विक्रम बार ते समाजमंदिरालगतचा रिक्षा स्टॅण्ड परिसर, नेरूळ सेक्टर सहामधील उद्यान व क्रिडांगण यासह अंर्तगत भागात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या बॅनर लावलेले पहावयास मिळतात. या अनधिकृत बॅनरमुळे महापालिका प्रशासनाचा आजवर लाखो रूपयाचा महसूलही बुडालेला आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पालिका प्रशासनाला अधिकार असताना अतिक्रमण विभागाकडून आजवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ व कामचुकारपणा दाखविण्यात आलेला आहे. अनधिकृत बॅनर लावून पालिका प्रशासनाचा महसूल बुडविणाऱ्यांनाच पालिकेच अतिक्रमण विभाग संरक्षण देत असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने नेरूळ विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच कारवाई केल्यास त्यांना आपल्या कामाची जाणिव होईल आणि अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात संबंधितांकडून कारवाई व्यापक केली जाईल.
अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांमध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले पालिकेचे कंत्राटी कामगार यांचाही समावेश होत आहे. नेरूळ व जुईनगर पश्चिमेला बाराही महिने अनधिकृत बॅनरमुळे आलेला बकालपणा व पालिकेच्या तिजोरीत लाखो रूपयांची होत असलेली घट याविषयी नवी मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.