नवी मुंबई : राज्यातील सत्ताबदलाचे पडसाद नेहमीच प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर उमटतात. भाजप-शिवसेनेचे सरकार जावून महाविकासआघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यामुळे भाजपशी सलगी असणारे अनेक प्रशासकीय अधिकारी धास्तावले आहेत. महाविकासआघाडीचे नेते बदली करणारच हे निश्चित झाल्याने क्रिमपोस्टसाठी दिलेली मिठाई पाण्यात जाणार असल्याची हळहळ अनेक प्रशासकीय अधिकारी आपसातील चर्चेत व्यक्त करू लागले आहेत.
महाविकासआघाडी नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करणार असल्याचे वृत्त दोन दिवसापूर्वी प्रकाशित होताच नवी मुंबईच्या महापालिका प्रशासकीय तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बदली टाळण्यासाठी मिसाळ आता अथक प्रयत्न करणार असल्याचे पालिका वर्तुळात बोलले जावू लागले आहे. नगरसेवकांमध्ये मिसाळांच्या बदलीवृत्ताविषयी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होवू लागल्या आहेत. मिसाळांवर प्रेम असणारे नगरसेवकांचा वर्ग मात्र मिसाळांच्या निवृत्तीला आता वर्ष-दीड वर्षाचा कालावधी राहीला असल्याने त्यांची बदली करू नये असा सूर आळवित आहे, तर काही नगरसेवक मात्र मिसाळांनी आमची कामे न करता ठराविक लोकांचीच कामे केली असल्याचे खासगीत सांगताना त्यांच्या बदलीचे आम्हाला कोणतेही सोयरसुतक नसल्याचे त्यांनी सांगितले.
मिसाळाच्या बदलीसाठी महाविकासआघाडी प्रयत्नशील असल्याचे वृत्त ऑनलाइन प्रकाशित होताच अवघ्या तासाभरातच हे वृत्त नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. वृत्ताबाबत नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पालिका अधिकारी व कर्मचारी आपसात चर्चा करत खातरजमाही करू लागले. नवी मुंबईत मिसाळांच्या बदलीवृत्तानंतर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असले तरी महिन्याभरात, फार तर दोन महिन्यात अथवा १५ ते २० दिवसांमध्ये अण्णासाहेब मिसाळांची बदली होणार असे मंत्रालयीन सूत्रांकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे.