सुवर्णा पिंगळे -खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : देशाच्या कानाकोपऱ्यात महिलांवरील अत्याचाराच्या, व्याभिचाराच्या घटनांत वाढ होत चालली आहे. महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. मुली व महिला आता कोठेही सुरक्षित राहीलेल्या नाहीत. महिलांच्या संरक्षणासाठी आता प्रशासकीय पातळीवरच ठोस व भरीव उपाययोजना करणे आता काळाची गरज बनली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ज्याप्रकारे विनामुल्य टेलिफोन सेवा बुथच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यायोगे एक्सप्रेस हायवेवर दुर्घटना घडल्यास संबंधितांना तात्काळ पोलिसांशी, कंट्रोलरूमच्या माध्यमातून संपर्क साधता येतो. त्याधर्तीवर राज्यात महिला व मुलींच्या संरक्षणासाठी राज्यातील शहरी व ग्रामीण भागात टेलिफोन बुथ उभारण्यात यावे. ज्या टेलिफोन बुथचा वापर केवळ महिला व मुलींनाच करता येईल. यासाठी राज्याच्या गृहविभागाने सर्व्हे करून लवकरात लवकर अंलबजावणीस प्रारंभ करावा अशी मागणी एका लेखी निवेदनातून युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा युवा अधिकारी निखिल मांडवे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
प्रायोगिक तत्वावर कोणत्या तरी शहराची किंबहूना मिश्र भाषिक असलेल्या नवी मुंबईची निवड करून अंलबजावणीस सुरूवात करावी. ठिकठिकाणी टेलिफोन बुथ उपलब्ध झाल्यास महिला व मुलींवर अत्याचार होवून त्यांचे पीडितेमध्ये रूपांतर होण्यापूर्वी ते पोलिसांशी मदतीसाठी संपर्क करू शकतील. या टेलिफोन बुथच्या माध्यमातून केवळ पोलिस व जनता यामध्ये संपर्क साधता येईल, अन्यत्र कोठेही नाही अशी तजवीज त्यामध्ये असावी. ही बाब खर्चीक असली तरी महिला व मुलींच्या शील संरक्षणासाठी आज आवश्यक आहे. याशिवाय निर्भया निधीचा वापर झाले नसल्याचे नुकतेच उजेडात आले आहे. या निधीचाही याकामी वापर करण्यात यावा. याशिवाय या टेलिफोन बुथच्या माध्यमातून खर्च अतिरिक्त वाटत असल्यास त्या टेलिफोन बुथवर जाहिरातीचे फलक लावण्याची तजवीज करावी की जेणेकरून गृहखात्याला उत्पन्नही प्राप्त होईल, असे निखिल मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्य सरकारचे विविध खात्यांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाळे विखुरलेले आहे. त्यामुळे त्यांना राज्याचा सर्व्हे करण्यास फारसा विलंब लागणार नाही. केवळ प्रबोधन करून अथवा रस्त्यावरील भितींवर सुभाषिते लिहून महिलांवरील अत्याचार कमी होणार नाहीत. अत्याचार झाल्यावर मेणबत्ती लावून सहानुभूती दाखविण्यापेक्षा अत्याचार होवू नये तसेच अत्याचार होण्यापूर्वी संबंधितांना मदत व्हावी यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात टेलिफोन बुथची सेवा विनामुल्य उपलब्ध व्हावी यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी युवा सेनेचे निखिल मांडवे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.