
श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीनंतर मनसेला खिंडार पाडण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळाले असले तरी या यशाचा आनंद त्यांना फार काळ पचविता आला नाही. मनसे सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपिठावर दिसलेली व्यासपिठावरील राजसमर्थक मंडळी पुन्हा मनसेमय झाल्याने ‘ज्यांना गजानन काळेंनी दहा वर्षे सांभाळले, त्यांना दहा दिवसही राष्ट्रवादी कॉंग्रेसला सांभाळता आले नाही’ अशी उपहासात्मक चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
घणसोलीतील संदीप गलुगडे, बेलापुरातून नितीन चव्हाण यांच्यासह अनेक स्थानिक भागातील पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाली. गजानन काळेंबाबत बोलताना सतत काळेसाहेब बोलणारी मंडळी शिंदेसाहेब बोलू लागली. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींच्या घरी मनसे सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांचे वाढदिवसही साजरे करू लागली. अमित ठाकरे ज्या दिवशी मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या मोर्चाचे नेतृत्व करत महापालिकेवर धडक देणार होते, त्याच्या अगोदरच्या पूर्वसंध्येला मनसेच्या त्या त्या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देत ते राजीनामे सोशल मिडियावरही व्हायरल करण्यात आले. अखेरचा जय महाराष्ट्र या शिर्षकाखाली काहींनी तर मनसे सोडल्याचे स्पष्ट संकेतही दिले.
एकेकाळी गजानन काळेंच्या खांद्याला खांदे लावून लढणारी, आंदोलन करणारी मंडळी अचानक राष्ट्रवादीत गेली, मनसे संपली असा टाहो काही राजकारण्यांनी फोडलाही. पण हे चित्र फार काळ टिकले नाही. जे सोडून गेले, त्यातील अनेकांनी पुन्हा घरवापसी केली, काही जण करण्याच्या तयारीत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींचा फज्जा उडाला असून राजकारणात त्यांचे हसे झाले आहे. मनसे सोडून जावून परत आलेल्या पदाधिकाऱ्यांवर गजानन काळे व सहकारी आता कितपत विश्वास ठेवणार, त्यांना पुन्हा पूर्वीचा मानसन्मान परत मिळणार काय याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.