नवी मुंबई – अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. २० – ३० रुपये किलोने विकला जाणारा कांदा थेट १०० ते १५० रुपये किलोवर पोहोचल्याने सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. त्यामुळे गोरगरिबांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, हा मूळ हेतू डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर महाराष्ट्र सैनिक, सानपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश (भाऊ) मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून बुधवारी स्वस्त दरात म्हणजे फक्त ४० रुपये किलोने १००० किलो कांदा वाटप करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राबविलेल्या या उपक्रमाला सानपाडा विभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सानपाडा विभागातील ५०० नागरिकांनी मनसेच्या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव विलास घोणे, शहर सहसचिव दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, महिला उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, उपविभाग अध्यक्ष संजय पाटील, उपविभाग अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, शाखा अध्यक्ष अमन गोळे, मनविसे उपविभाग अध्यक्ष श्रीकांत आतकरी, समाजसेविका सुनंदा दळवी उपस्थित होते.