स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सी.बी.डी. बेलापूर येथे पाम बीच मार्गावर किल्ले गावठाण समोरील नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय इमारत ही वास्तुरचनेचा देशातील एक उत्कृष्ट नमुना मानली जाते. त्यामुळे सदर इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त कार्यालय यांचेमार्फत वेळोवेळी विविध सूचना केल्या जातात. या अनुषंगाने महापालिका मुख्यालय इमारतीतील सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
यामध्ये, मुख्यालय इमारतीच्या प्रवेशव्दार क्र. १ मधूनच प्रवेश करावयाचा असून इतर प्रवेशव्दारांमधून प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे सर्व महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत आपले ओळखपत्र दर्शनी भागावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील अशा स्पष्ट सूचना आहेत. यात करारपध्दतीवरील तसेच ठेकेदारामार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांनीही दर्शनी भागात ओळखपत्र लावावयाचे आहे.
नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी महापालिका मुख्यालयात येण्याकरिता निश्चित वेळ असावी व याद्वारे त्यांच्या अमूल्य वेळेत बचत व्हावी यादृष्टीने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत अभ्यागतांना मुख्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारीवृंदास कार्यालयातील काम विहित वेळेत करता येईल व नागरिकांसाठीही निश्चित वेळ असल्याने त्यांना सुविधाजनक ठरेल.
मुख्यालयामध्ये कोणत्याही प्रकारच्या विक्रेत्यास अथवा व्यावसायिक दृष्टिकोनातून येणाऱ्या एजंट यांना आमंत्रित करण्यात येऊ नये असे सर्व अधिकारी, कर्मचारी यांस काटेकोर निर्देश देण्यात आले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची वास्तू आयकॉनिक म्हणून नावाजली जात असून इमारत सुरक्षा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे असे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.