नागपूर : काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विचार आहे. भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध आणि विभाजनवादी अजेंड्याला राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढवणारा काँग्रेस विचारच रोखू शकतो. काँग्रेसची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी तरूणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरात असल्याने प्रांताध्यक्ष बाळासहेब थोरात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील काँग्रेस कमिट्यांच्या बैठका बोलावल्या आहेत. मंगळवारी त्यांनी भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा केली तसेच संघटनात्मक बाबींची माहिती घेतली. आज सकाळी सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी त्यांनी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आ. यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन, आ. सासाराम कारोटे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. मोहन जोशी, डॉ. कल्याण काळे, रामकिशन ओझा, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बाबा कटरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व गोंदिया जिल्हा प्रभारी प्रा. बबनराव तायवाडे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष ना. थोरात म्हणाले की, विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. अडचणीच्या काळात काही नेते आमदार पक्ष सोडून गेले पण विदर्भाने काँग्रेसला साथ दिली. जे पक्ष सोडून गेले त्यांच्या जागी तरूणांना संधी देऊन नविन नेतृत्व तयार करू. आगामी काळात सर्वांनी एकत्रितरीत्या सर्वांना सोबत घेऊन संघटना मजबूत करावी. जेणेकरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल. काँग्रेस पक्षाला विदर्भाने नेहमीच ताकद दिलेली आहे. पुढच्या काळात पक्ष विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून ताकद देईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात गुरुवार दि. १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.