श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने काही दिवसापूर्वीच स्वच्छता निरिक्षकांचे निलंबन केले आहे. ते निलंबन महापालिका प्रशासनाने रद्द करावे अन्यथा स्वच्छता भारत अभियानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महापालिकेतील स्वच्छता निरिक्षकांच्या वतीने नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
महापालिका प्रशासनाने काही दिवसापूर्वीच स्वच्छता निरिक्षक अरूण पाटील यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले असून कामगारांचे व अधिकाऱ्यांचे मानसिक संतुलनही ढासळू लागले आहे. यासंदर्भात स्वच्छता निरिक्षकांची भूमिका मांडण्यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी गुरूवारी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेत निवेदनही सादर केले. या चर्चेत स्वच्छता निरिक्षकांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई महापालिका प्रशासनाने रद्द न केल्यास उर्वरित स्वच्छता निरिक्षक व कर्मचारी स्वच्छ भारत अभियानावर बहीष्कार टाकतील असा इशारा नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात रवींद्र सावंत म्हणाले की, स्वच्छता निरीक्षक अरूण पाटील यांचे आपण निलंबन केले. आपण हा कठोर निर्णय घेतलात हे आमचे प्रामाणिक मत आहे. अरूण पाटील यांच्याबाबत निर्णय घेताना त्यांची आजवरची सेवा, त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न, अहोरात्र केलेले परिश्रम या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षक या पदाला न्याय देताना अरूण पाटील यांनी पहाटेपासून आपल्या कामास सुरूवात करताना रात्री उशिरापर्यत त्यांनी काम केला आहे. पदपथ, सार्वजनिक जागा तसेच अन्य ठिकाणी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करणे, सार्वजनिक शौचालयाची सतत पाहणी व स्वच्छता याला प्राधान्य दिले आहे. महापालिकेला स्वच्छता अभियानात मिळालेल्या पुरस्कारामध्ये अरूण पाटील यांच्या परिश्रमाचा खारीचा वाटा आहे. अस्वच्छतेबाबत कारवाई करण्यापूर्वी त्यांनी संबंधितांना एक दिवसाची माणूसकीखातर मुदत देवून दुसऱ्या दिवशी जावून पाहणीही केलेली आहे.
अरूण पाटील यांच्या झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे संबंधित विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. प्रामाणिकपणे काम करूनही पहाटे ते रात्री उशिरापर्यत पालिकेसाठी केलेल्या परिश्रमाला निलंबन हे बक्षिस असेल तर कोणताही अधिकारी व कर्मचारी काम करताना एकदा नाही तर दहावेळा विचार करेल. आपण या निर्णयाचा पुर्नविचार करून प्रामाणिकपणे काम करणाऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. आपण निलंबनाचा निर्णय कायम ठेवल्यास पालिकेचे कर्मचारी व अधिकारी स्वच्छता अभियानाता एका विशिष्ठ दहशतीखाली काम करतील, प्रामाणिकपणे काम करणार नाहीत. आपल्या चुकीच्या निर्णयाविरोधात आम्हाला कामगार संघटनेच्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही यावेळी रवींद्र सावंत यांनी दिला आहे.
स्वच्छता निरिक्षकांचे निलंबन होवून काही दिवस उलटले तरी अन्य कामगार संघटना मौनीबाबाच्या भूमिकेत असताना इंटकच्या माध्यमातून कामगार नेते रवींद्र सावंत यांनी स्वच्छता निरिक्षकांच्या भूमिकेला वाचा फोडल्याचे समाधान कामगार वर्गात व्यक्त केले जात आहे.