जयदीप जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : लवकरच होत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणूकांकडे राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहीले आहे. बाजार समिती आवारातील ठराविक मातब्बर भाजपत गेल्यामुळे मतदाररूपी व्यापारी व अ वर्ग खरेदीदार त्यांना निवडून देणार का शरद पवारांवरील आपले प्रेम मतपेटीतून व्यक्त करणार यावरही संचालक निवडणूकीची समीकरणे ठरणार आहेत. १४ डिसेंबर रोजी बाजार समिती संचालक पदाच्या निवडणूकीसाठी मतदारसंघ निहाय (मार्केट) मतदार याद्या प्रकाशित होणार असल्याने बाजार समिती आवाराचे या मतदार याद्यांकडे लक्ष लागून राहीले आहे.
अनेक वर्षानी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणूका होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजी, फळ व कांदा बटाटा या कृषी क्षेत्राशी संबंधित मार्केटवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने शरद पवारांचा प्रभाव आहे. आजवरच्या संचालक पदाच्या झालेल्या निवडणूका व येवू घातलेल्या संचालकपदाच्या निवडणूका यात फरक असल्याने भाजप का राष्ट्रवादी या पक्षांचा बाजार समिती आवारावरील प्रभाव निश्चित होणार आहे. यापूर्वी झालेल्या संचालकपदाच्या निवडणूका या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घटकांमध्ये झालेल्या असून विजयी होणारा व पराभूत होणाराही राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच अर्थात शरद पवारांचे समर्थक असायचे. परंतु मधल्या काळात राजकीय घडामोडीमध्ये उलथापालथ झाल्या. भाजपच्या वाढत्या प्रभावाचे बाजार समितीमधील मार्केट आवारातील काही मातब्बरांमध्ये भाजपविषयी कमालीचे आकर्षण व प्रेम निर्माण झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते व नवी मुंबईतील राजकारणाचे सर्वेसर्वा गणेश नाईकांनी भाजपात प्रवेश केल्यावर मार्केटमधील मातब्बरांनी भाजप व नाईकांवरील प्रेमापायी शरद पवारांवरील प्रेमाला मूठमाती देत भाजपात प्रवेश केला. राज्यात एकेकाळी सत्तेवर असणाऱ्या भाजपला आता विरोधी पक्षात बसण्याची पाळी आली आहे आणि विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीने शिवसेना व कॉंग्रेसची मोट बांधत सत्तासंपादन केली आहे.
बाजार समिती संचालक निवडणूकीसाठी परवानाधारक व्यापारी व अ वर्ग खरेदीदार यांनाच मतदानाचा अधिकार आहे. पालिका, विधानसभा निवडणूकीसाठी राजकारणी बोगस मतदारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी राजकारण्यांकडून केली जाते. त्या धर्तीवर त्या काळातील संचालकांनी तसेच निवडणूक लढविण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांनी संचालक निवडणूक लढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अ वर्ग खरेदीदार निर्माण केले आहेत व आपल्या जवळच्या मंडळींना, नातलगांना परवानाधारक व्यापारी बनविले आहेत. संचालक निवडणूकीसाठी मार्केट आवारातील मतदारांची यादी १४ डिसेंबरला प्रकाशित होणार आहे. मतदारयादी प्रकाशित झाल्यावर बाजार आवारातील घटकांकडून मोठ्या प्रमाणावरआक्षेप घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार आवारातील व्यापारी व इतर घटक शरद पवारांना मानणारे असल्याने ते कोणाला मतदान करणार यावर बाजार आवारातील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव स्पष्ट होणार आहे. मतदारयादी प्रकाशित झाल्यावरच कोणी किती मतदार नोंदविले आहेत, किती खरे आहेत व किती नावे घुसविण्यात आले आहेत हे स्पष्ट होणार आहे. भाजी मार्केटमध्ये गुप्ता नावाच्या एका मातब्बर घटकाने मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांची नावे मतदारयादीत घुसविल्याची चर्चा आहे. भाजी मार्केटच्या एका मातब्बरांचा समर्थक असणाऱ्या गुप्तालाच आता निवडणूक लढविण्याची महत्वाकांक्षा जागी झाल्याने पिंगळे-गावडे या पारंपारिक विरोधकात गुप्ताही निवडून येण्याची भीती भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कांदा बटाटा मार्केटमध्ये अशोक वाळूंजांचे पारडे सध्या जड असून फळ मार्केटमध्ये पानसरे-बेंडे वादात मुस्लिम मातब्बराची संचालक पदी वर्णी लागण्याची कुजबुज सध्या फळ मार्केटमध्ये सुरू झाली आहे.