इतक्या सकाळी सभा आयोजनाबाबत पालिकेत उलटसूलट चर्चा
नवी मुंबई : स्थायी समितीची सभा नवी मुंबई महापालिका मुख्यालयात शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. इतक्या सकाळी स्थायी समिती सभा आयोजनाबाबत महापालिका वर्तुळात उलटसूलट चर्चा होत असून आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे.
या सभेमध्ये बेलापुर सेक्टर १५ येथे बहूमजली वाहनतळ उभारणी करणे, संगणकीय प्रिंटरकरिता टोनर पुरविण्याकरिता वार्षिक दरकरार करणे, नेरूळ सेक्टर ५० येथील मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा उद्यानाकरिता पुर्नवापर करणे, महापालिकेस प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेली कार व जीप वाहन भाडेतत्वावर पुरविणेसाठीच्या मे. पूर्वा ट्रॅव्हल्सच्या कंत्राटास मुदतवाढ देणे या चार विषयांचा विषयपत्रिकेवर समावेश आहे.
सर्वसाधारणपणे महापालिका सभागृहात कर्मचारी येण्याचा कालावधी लक्षात घेता स्थायी समितीची सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येते. निवडणूका नसल्याने सध्या आचारसंहितेची कोणतीही टांगती तलवार नसताना महापालिका प्रशासनाने सकाळी ९ वाजता स्थायी समितीची सभा आयोजित केल्याचे आश्चर्य व्यक्त कऱण्यात येत आहे.