अनंतकुमार गवई
पनवेल : ११सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल केलेल्या १६२ रुग्णांना डॉक्टर उपलब्ध नसल्याने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. आज याकरिता कांतीलाल कडू यांनी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. भक्तीकुमार दवे यांच्या समवेत जावून माहिती घेतली. तसेच सविस्तरपणे चर्चा करून सहकार्य करण्याचे आश्वासनही अधीक्षक डॉ. नागनाथ येमपल्ले यांना दिले. त्यांच्यासोबत डॉ. प्रमोद पाटील, डॉ. फाळके आणि प्रशासकीय अधिकारी जाधव उपस्थित होते.
आतापर्यंत ५८७१२ रुग्णांनी तपासणीचा चार महिन्यांत रुग्णालयाचा लाभ घेतला. त्यातील १७३१ जणांना दाखल करून उपचार सुरू आहेत. विशेषतः २०८ जणींचे इथे नैसर्गिकरित्या बाळंतपण करण्यात उपस्थित आया आणि डॉक्टरांना यश आले आहे. परंतु स्त्री रोग तज्ञ नसल्याने १६२ जणींना सिझरसाठी अन्यत्र पाठवावे लागले आहे.
१५ जणांवर गंभीर तर २०२ जणांवर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. १२३९ जणांचे क्ष- किरण (एक्सरे) काढण्यात आले आहेत. रुग्णांच्या विविध प्रकारच्या रक्त तपासणीसाठी २९१२२२ रक्त घेवून तपासणी केल्याची नोंद नोंदवण्यात आली आहे.
विविध गुन्ह्यातील ५६४६ जणांची वैद्यकीय शारीरिक तपासणी करण्यात आली तर त्यापैंकी १९६ जणांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
धक्कादायक बाब म्हणजे १५७ जणांना सर्पदंश तर १३३ जणांना विंचूदंश झाल्याने त्यांच्यावर उपचार केल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय संशयास्पद दंशाचे ६० रुग्ण दाखल झाले होते. इतर ठिकाणच्या डॉक्टरांनी २६ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात तर इथून ४९० रुग्ण दुसरीकडे उपचारासाठी बाहेर पाठवावे लागले आहे.
अवघ्या चार महिन्यात विविध कारणांनी मृत पावलेल्या ६८८ जणांचे शवविच्छेदन सुद्धा इथे करण्यात आले आहे. याशिवाय बाळंतपणासाठी इतर डॉक्टरांनी 7 रुग्ण पाठवले होते. असा आलेख असून १२० खाटांपैंकी अवघ्या १५ ते १८ खाटावर रुग्ण दाखल होत असून अख्खं रुग्णालय ओस पडले आहे. अतिदक्षता विभाग, डायलेसीस यंत्रणा अद्याप सुरू झालेली नाही.
मात्र, राज्य सरकारची रूण्गलयातून सुरू असलेली रुग्णसेवा वाढविण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्वांना रुग्णालयाची माहिती देवून अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय सुविधांचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि इतरांना घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.
येथील डॉक्टर अनुभवी आहेत. रुग्णांना आपुलकीने सेवा देतील, अशी अपेक्षा आहेच शिवाय रुग्णांची संख्या वाढली की शासनाकडून आपल्याला सोयीसुविधांकरिता पाठपुरावा करणे अधिक सोपं जाणार आहे. सध्या इतरत्र रुग्णांची होणारी लुट आणि हेळसांड टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय अधिक प्रभावी ठरेल असे वाटते, असा दावा कडू यांनी केला आहे.