सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ मध्ये नागरिकांच्या सहयोगाने नवी मुंबई शहर देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी सज्ज झालेले असताना या कार्यात लोकप्रतिनिधी देखील उत्साहाने सहभागी झालेले असून स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी शनिवारी, दि. ११ जानेवारी रोजी विविध क्षेत्रांना भेटी देत, ठिकठिकाणी नागरिकांशी सुसंवाद साधत स्वच्छ सर्वेक्षणात अधिक जोमाने सहभागी होण्याचे आवाहन केले.
सभापती नेत्रा शिर्के यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ १ चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांच्यासह नवी मुंबईतील नागरिकांचे व पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या वाशीतील मिनी सी शोअर भागाला भेटी देत स्वच्छतेच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्याठिकाणी विशेषत्वाने सकाळी व संध्याकाळी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन सकाळी व रात्री दोन वेळा काटेकोर साफसफाई करण्याच्या सूचना केल्या.
वाशी रेल्वे स्टेशनवर राबविलेल्या ‘स्वच्छता मित्र’ संकल्पनेने प्रभावित होत आणखी काही ठिकाणी ही संकल्पना राबवावी असे त्यांनी सूचित केले. तसेच ‘स्वच्छता मित्र’ बनत त्यांनी स्वच्छतेची शपथही ग्रहण केली. सेक्टर १७ वाशी येथील महाराजा मार्केट मध्ये त्यांनी अंतर्गत व बाह्य स्वच्छतेचा आढावा घेतला व विशेषत्वाने त्याठिकाणी प्लास्टिक पिशवी दिली जात नाही याबद्दल समाधान व्यक्त केले. प्लास्टिक प्रतिबंधाची मोहीम भाजी, मासळी मार्केटपासूनच अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी असे त्यांनी सूचित केले.
नेरूळ येथील स्टेट बँक कॉलनीच्या भेटीमध्ये तेथील रहिवाशी सातत्याने ओला व सुका कचऱ्याचे घरापासूनच वर्गीकरण करतात तसेच सोसायटीच्या आवारातच खत प्रकल्प राबवून त्याची विल्हेवाट लावतात हे प्रशंसनीय आहेच, तथापि त्याहून अधिक कौतुक हे ते सातत्याने करताहेत असे सांगत नेत्रा शिर्के यांनी या रहिवाशांचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला हवा असे म्हटले. सध्या स्वत:चे सॅनिटरी वेंडीग मशीन सोसायटीने बसविलेले आहे त्याबद्दल उपमहाव्यवस्थापक सुबोध जैन, सहा. महाव्यवस्थापक अरविंद मिश्रा आणि सर्व रहिवाशी यांची विशेष प्रशंसा त्यांनी केली. अशाच प्रकारे सेक्टर १८ नेरूळ येथील सी ब्रिज सोसायटीत व्यवस्थापक गोपालस्वामी श्रीधर आणि रहिवाशांशी संवाद साधत रहिवाशी स्वत:हून स्वच्छता कार्यात पुढाकार घेतात, त्याचे सभापतींनी कौतुक केले. नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छतेत देशात नंबर वन असावे ही प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे व त्या दृष्टीने प्रत्येक नागरिक स्वच्छता कार्यात सहभागीही होत आहे. त्यामुळे शहरात एक स्वच्छतेची लाट पसरलेली दिसत आहे. तरी प्रत्येक नागरिकाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ मध्ये आपल्या नवी मुंबई शहराला पैकीच्या पैकी मार्क द्यावेत असे आवाहन नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी केले आहे.