सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्वच्छतेचे महत्व नागरिकांना मनापासून पटले असून स्वच्छता ही सवय व्हावी यादृष्टीने स्वच्छतेचा संदेश लघुपटासारख्या मनोरंजक माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम ५२ लघुपटांनी सहभागी होत यशस्वी केला असून याव्दारे युवकांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळत असल्याचा आनंद महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केला. नवी मुंबई शहराचा स्वच्छतेत राज्यातील पहिला क्रमांक यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२० ला सामोरे जाताना देशात पहिला आणण्यासाठी प्रत्येकाने आपले सक्रीय योगदान द्यावे असे आवाहनही महापौरांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० लघुपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी महापौर आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, सभागृह नेता रविंद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के, प्रभाग समिती अध्यक्षा श्रध्दा गवस व अंजली वाळुंज, आरोग्य समितीच्या सभापती शशिकला पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती जयाजी नाथ, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती कविता आगोंडे, नगरसेवक अशोक गुरखे, गिरिश म्हात्रे, सुनिल पाटील, प्रकाश मोरे, गणेश म्हात्रे, शुभांगी पाटील, अनिता मानवतकर तसेच अंतिम फेरीचे परिक्षक सुप्रसिध्द दिग्दर्शक जयंत पवार आणि उप आयुक्त तुषार पवार व दादासाहेब चाबुकस्वार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वच्छता ही प्रत्येकाने करावयाची गोष्ट असून सामुहीक सहभागातूनच यश मिळू शकते असे सांगत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये पहिल्या सहामाहीच्या सर्वेक्षणात नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर निर्देशित असून आपण सर्वांनी एकत्रितपणे ठरविले तर आपला देशात पहिला क्रमांक येईल असा विश्वास व्यक्त केला. सर्वसाधारणपणे मुलांवर पालक, शिक्षक, मोठी माणसे संस्कार करतात असे चित्र दिसते, मात्र स्वच्छतेच्या बाबतीत या उलट चित्र असून मुलेच मोठ्यांना स्वच्छतेची शिकवण देताना दिसतात असे आयुक्त म्हणाले.
प्रास्ताविकपर मनोगतात स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी स्वच्छतेतील छोट्या छोट्या गोष्टींनी देशातील गावे, शहरे बदलत आहेत असे सांगत नवी मुंबई हे नेहमीच स्वच्छतेत अग्रेसर राहिले आहे याचे कारण शहर स्वच्छतेमध्ये येथील नागरिकांचा नेहमीच सक्रीय सहभाग राहीला आहे असे मत व्यक्त केले. युवकांच्या कल्पनांना मुक्त वाव देणारा लघुपटासारखा महोत्सव आयोजित करून शहरातील तरुणाईला स्वच्छता मोहिमेकडे वळविण्याचा उद्देश सफल झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
लघुपट स्पर्धेचे अंतिम फेरीचे परिक्षक जागो मोहन प्यारे, अस्मिता अशा गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शक जयंत पवार यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून स्वच्छतेचे प्रबोधन करणारे आपण एक प्रकारचे आधुनिक संत आहाहत अशा शब्दात सहभागी लघुपट निर्मात्यांचा गौरव केला. नवी मुंबई सारखे मुळातच स्वच्छ शहर असताना येथील युवक लघुपटात काय दाखवतील याची उत्सुकता होती असे सांगत जयंत पवार यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यक्रमाला थांबणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. बाहेरच्या शहरांनी नवी मुंबईकडून बोध घ्यावा असे सांगत त्यांनी नवी मुंबईतील प्रत्येक घटकाला पटलेल्या स्वच्छता संदेशाची प्रशंसा केली.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 लघुपट स्पर्धेत अनडिस्ट्रॉएबल हा लघुपट प्रथम क्रमांकाच्या २५ हजार आणि स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र पुरस्काराचा मानकरी ठरला. भविष्य या लघुपटाने व्दितीय क्रमांकाचे १५ हजार आणि स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच धप्पा या लघुपटाने तृतीय क्रमांकाचे दहा हजार आणि स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र बक्षिस पटकाविले. धप्पा या लघुपटाची सर्वोत्कृष्ट विनोदी लघुपट म्हणून निवड करण्यात आली. वैयक्तीक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अक्षय बल्लाळ (अनडिस्ट्रॉएबल), सर्वोत्कृष्ट अभिनेता – निकेतन सरतापे (धप्पा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सिओना मगर (भविष्य), सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – आकाश सांबरे (टू आय लेट), सर्वोत्कृष्ट लेखन – अक्षय बल्लाळ (अनडिस्ट्रॉएबल), सर्वोत्कृष्ट बालकलाकार – मिहीर थोरात (निअर मी), सर्वोत्कृष्ट संकलक कुनाल आणे (धप्पा), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत बामशी रामा देवी (धप्पा) यांनी आपली मोहर उमटवली.
यावर्षी लघुपट स्पर्धेत ५२ लघुपटांनी सहभाग नोंदविला. त्यामधील १० लघुपटांची अंतिम फेरीसाठी सचिन सावंत, किरण कदम, मयुर सावंत, सुशिल मोरे या प्राथमिक फेरीच्या परिक्षकांनी निवड़ केली. हे १० लघुपट www.nmmcsff.in या वेबसाईटवर नागरिकांच्या मतांसाठी ठेवण्यात आले होते. एकूण निकालात नागरिकांच्या मताला ३० टक्के व अंतिम फेरीचे परिक्षक नामांकित दिग्दर्शक जयंत पवार यांच्या मताला ७० टक्के असे प्राधान्य जाहिर करण्यात आले होते. तीन दिवसात ७९३२ नागरिकांनी हे लघुपट पाहून आपल्या आवडत्या लघुपटाला मत दिले होते. त्याचा आणि परिक्षकांचा अशा दोन्ही मतांचा विचार करून अंतिम फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी रितीने आयोजित करण्यात सहकार्य करणाऱ्या मयुर एज्युकेअर सोसायटी, चेंज युवर लाईफ फाऊंडेशन आणि आर.डी.फिल्म्स या संस्थांच्या प्रतिनिधीना सन्मानित करण्यात आले. यावेळी स्पार्क आणि ऑसम डान्स ॲकॅडमीच्या बाल कलावंतांनी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद घेतली. टिक टॉक आणि सोशल मिडियावर प्रसिध्द असणारे कलावंत गिरीश म्हात्रे, पपन पाटील, सुप्रिया तळकर, पायल पाटील, प्रशांत नाकती, स्नेह महाडीक, सोनाली सोनावणे, निक शिंदे, रोशन जाधव, आय. एम. बूब 000 यांनीही विविध लोकप्रिय गीते सादर करून कार्यक्रमात स्वररंग भरला.