नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांचे नगर विकास प्रधान सचिवांना निवेदन
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रम यांच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लवकरात लवकर लागू करण्यात यावी अशाप्रकारचे निवेदन महापौर जयवंत सुतार यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीम. मनिषा पाटणकर म्हैसकर यांना दिले असून त्यास त्यांनी सकारात्मकता दर्शविलेली आहे. याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील, प्रशासन विभागाचे उप आयुक्त किरणराज यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेचा आस्थापना खर्च हा राज्यात सर्वात कमी साधारणत: १८.५ टक्के इतका असून नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक क्षमता उत्तम असल्याचे सांगत महापौर जयवंत सुतार यांनी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू केल्यास आस्थापना खर्चात होणाऱ्या वाढीचा आर्थिक बोजा सहन करण्यास महानगरपालिका सक्षम असल्याचे ठळकपणे नमूद केले.
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत २ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तत्पुर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांस सातवे वेतन आयोग लागू करण्यास सर्वसाधारण सभेने २७ फेब्रुवारी २०१९ रोजी ठराव क्रमांक ९७८ अन्वये मंजूर दिली होती. याविषयी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या तिव्र भावना लक्षात घेऊन याबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे महापौर जयवंत सुतार यांनी विनंतीपूर्वक सूचित केले आहे.
त्याचप्रमाणे महानगरपालिकेची विविध विभागांची सेवाप्रवेश नियमावली शासन मंजूरीकरिता पाठविण्यात आलेली असून त्यालाही मंजूरी मिळाल्यास महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची पदोन्नती, विभागांतील आवश्यक पदभरती करणे शक्य होणार असून त्यामुळे महानगरपालिकेचे कामकाज अधिक सुरळीत होईल यादृष्टीने सेवाप्रवेश नियमावली मंजूरीसाठी सहकार्य करावे अशीही विनंती महापौर जयवंत सुतार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीम. मनिषा पाटणकर म्हैसकर यांना केली. याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविल्याने या दोन्ही बाबींवर लवकरात लवकर शासन निर्णय होईल असा विश्वास महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केला आहे.