रामभाऊ पाटील यांना हंसारामबुवा नेरुळकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : रामभाऊ हे केवळ वाशी गावचे सुपुत्र नसून संपूर्ण नवी मुंबईचे सुपुत्र आहेत. लेखक, दिग्दर्शक, नाट्यकलावंत, भजन प्रेमी, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता अशा बहुआयामी व कलंदर व्यक्तिमत्त्वाच्या रामभाऊंचे नवी मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन लोकनेते गणेश नाईक यांनी वाशी येथे केले.
नवी मुंबई भूषण रामभाऊ पाटील यांच्या ७५व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वाशी येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी रामभाऊ पाटील यांना गणेश नाईक यांच्या हस्ते भजनयात्री हंसारामबुवा नेरुळकर प्रतिष्ठानच्या हंसारामबुवा नेरुळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावर महापौर जयवंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, दत्तूशेठ पाटील,सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विजय पाटील, हंसारामबुवा नेरुळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमृत पाटील नेरुळकर, लोक कलावंत दामोदर शिरवाळे, सुप्रसिद्ध जादूगार संजय कुमार, आदी उपस्थित होते.
रामभाऊ पाटील हे कलावंतांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून त्यांच्या स्वभावातील शालीनता पाहिली की रामभाऊ पाटील हे खरोखरच आगरी समाजातील आहेत का असा प्रश्न पडतो. असे गौरवोद्गार महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी काढले.
यावेळी कळवा बेलापूर विभागातील भजन कलावंतांच्या ‘भजन संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महादेवबुवा शहाबाजकर, अशोकबुवा म्हात्रे, बाळारामबुवा पाटील, गजेंद्रबुवा तांडेल, दत्ताबुवा नाईक आदी भजन कलावंतांनी भजने सादर केली.
गौरवमूर्ती रामभाऊ पाटील यांनी यावेळी अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे, मान्यवरांचे हितचिंतकांचे तसेच हंसारामबुवा नेरुळकर प्रतिष्ठानचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करतानाच मी या क्षेत्रात पूर्णतः आनंदी, समाधानी असल्याचे सांगून शेवटच्या श्वासापर्यंत हा देह सत्कारणी लागावा अशी मनिषा व्यक्त केली.