सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिघा ते सीबीडी बेलापूर परिसरात २६ मध्यवर्ती स्मशानभूमी असून त्याठिकाणी अंत्यसंस्काराप्रसंगी दिवंगत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करताना अनेकदा मोठया संख्येने नागरिक उपस्थित असल्याने ध्वनीक्षेपक यंत्रणेची गरज भासते. त्यानुसार स्मशानभूमीत ध्वनीक्षेपक यंत्रणेची सुविधा असावी याकरीता नागरिकांकडून सतत मागणी होत असते. या अनुषंगाने नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी सर्व स्मशानभूमींमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणेची सुविधा करणेबाबत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना सूचीत केले आहे.
अंत्यसंस्कारांच्या वेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांकडून दिवंगताविषयी आठवणी सांगितल्या जातात, श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले जाते. विशेषत्वाने ग्रामीण भागातील व्यक्ती दिवंगत झाल्यानंतर पार्थिवावर अंतिम संस्कार होत असताना ग्रामस्थांकडून भजन केले जाते. नवी मुंबई महानगरपालिकेची ओळख अत्याधुनिक शहर केली जाते. त्या दृष्टीने येथील स्मशानभूमीही अद्ययावत आहेत. त्याठिकाणी मोफत अंत्यसंस्काराची सुविधा महानगरपालिकेच्या वतीने पुरविली जाते. हे बघता या स्मशानभूमी अधिक आधुनिक व्हाव्यात यादृष्टीने नागरिकांच्या मागणीनुसार याठिकाणी ध्वनीक्षेपक यंत्रणा असण्याची गरज लक्षात घेऊन याविषयी कार्यवाही करण्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सूचीत केले आहे.