
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, रोजच्या कुटुंबाच्या धावपळीत अनेक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य अधिक बिघडत चालले आहे. त्यात प्राणायाम, व्यायाम करण्याची इच्छा असतानाही घरापासून या सुविधा लांब असल्याने महिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे जाणे होत नाही. त्यामुळे घराच्या परिसरातच उद्यानामध्ये खुल्या व्यायामशाळांची (ओपन जिम) ची तेथील स्थानिक नागरिकांची मागणी होती. याच अनुषंगाने व्यायाम साहित्य उपलब्ध केल्यास त्याचा उपयोग करता येईल या विचारातून बेलापूर विधानसभा क्षेत्रात माझ्या आमदार निधीचा वापर करत ओपन जिम उभारण्यात आले आहेत. यापूर्वीही विविध उद्यानात एकूण २२ ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले आहे. व्यायामाचे अत्याधुनिक साहित्य बसविण्यात आले असून त्यामध्ये सायकलिंग, एअर वाकॅर्स, रोईंग, चेस्ट प्रेस या साहित्यांचा समावेश आहे. त्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा व्यायाम करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांचा खुल्या व्यायामशाळांकडे ओढा वाढला असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच तरुणाईही मोठय़ा संख्येने दिसून येत आहे. विशेष म्हणजे ताणतणाव, वाढलेले वजन यातून मुक्ती मिळण्यासाठी महिलाही खुल्या व्यायामशाळांकडे वळल्याचे चित्र पाहावयास मिळते. या परिसरातील सर्व नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक करत रोज व्यायामशाळेत येण्याचा निर्धार व्यक्त केला असून परिसरातील स्थानिक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांचा आनंद पाहून समाधान वाटत असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.