स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नामदेव भगत यांचा आगरी कोळी महोत्सव हा आता केवळ आगरी कोळी समाजाचा महोत्सव राहिला नसून या शहरातील विविध जाती धर्मियांना सोबत घेऊन जाणारा महोत्सव झाला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आज माणूस जोडण्याचं उत्तम कार्य होत असून नेरूळमध्ये आकाराला आलेलं आगरी कोळी सांस्कृतिक भवन हे याच महोत्सवाचं फलित असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी नेरुळ येथे व्यक्त केले.
महोत्सवात रविवारी आगरी कोळी समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यापिठावर शिवसेना उपनेते अनंत तरे, खारी कळवा बेलापूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर पाटील, कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी, सामाजिक कार्यकर्ते विकास कोळी, माजी नगरसेविका इंदुमती भगत, नगरसेविका पुनम पाटील, उलवे गावच्या सरपंच कविता खारकर, इंटकचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मिथुन पाटील, सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खारी कळवा बेलापूर शेतकरी संघटनेचे सरचिटणीस ऍड पी.सी. पाटील यांना आगरी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई, नवी मुंबईचा पहिला मालक असलेला आगरी कोळी समाज हा सदैव उपेक्षित, दुर्लक्षित राहिला असून यास्तव नामदेव भगत यांच्या सारखी समाजाची जाण असणारी माणसे विधिमंडळात जाणे गरजेचे असल्याचे मत यावेळी शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी व्यक्त केले.
आगरी कोळी समाज हा संस्कारक्षम समाज असून या समाजात हुंडा दिला घेतला जात नाही, तलाक दिला जात नाही, तंबाखू, विडी, सिगारेटचे व्यसन केले जात नाही, स्त्रियांचा सन्मान केला जातो, दुसऱ्याचं सतत आदरातिथ्य केलं जातं, या समाजातील ही बाब उल्लेखनीय असल्याचे महोत्सवाचे आयोजक नामदेव भगत यांनी यावेळी सांगितले.
गेली पन्नास वर्षे समाजाचे प्रश्न सुटत नसल्याची खंत व्यक्त करुन नव्या सरकारकडून समाजाचे प्रश्न सुटतील. असा आशावाद व्यक्त करतानाच मला मिळालेला पुरस्कार हा घरचा पुरस्कार असून यापुढे माझ्यावरील जबाबदारी वाढली असून याची मला जाण आहे. असे गौरवमूर्ती ऍड पी.सी. पाटील यांनी यांनी यावेळी
दरम्यान डॉ. उमेश कामतेकर यांच्या लावणी संग्राम या मनोरंजनाच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महोत्सवाला भेट देण्यासाठी रोजच गर्दी वाढत असून रविवारी १० हजाराहून अधिक लोकांनी या महोत्सवाला भेट दिल्याने रविवार या महोत्सवाचा हाऊस फुल ठरला.