सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबईतील ऐरोली दिघा विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष गजानन काळे व उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली येथील मनपा विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक व नागरिक उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी छायाचित्रांसहित नागरी समस्यांचा पाढाच विभाग अधिकारी जाधव यांच्यासमोर वाचला. यावेळी विभाग अधिकाऱ्यांविरोधात “या अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोकं वरती पाय..”, “परत करा आमचे फुटपाथ, नका करू हाथ साफ…”, “श्रीमंत आमची पालिका, मग रस्त्यांचे हाल का ?….”, “पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे…..”, “बंद करा भ्रष्टाचार फुटपाथ वर आमचा अधिकार….” या घोषणा देऊन मनसैनिकांनी हल्लाबोल करून परिसर दणाणून सोडला. नेरुळ विभाग कार्यालय, कोपरखैरणे विभाग कार्यालय, वाशी विभाग कार्यालय, तुर्भे विभाग कार्यालयांवरील आंदोलनांनंतर नागरी समस्यांबाबत नवी मुंबई मनसेचे हे पाचवे आंदोलन होते.
गेल्या कित्येक दिवसांपासून ऐरोली दिघा विभागातील नागरिकांना विविध समस्यांनी पछाडले आहे. या नागरी समस्यांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले पदपथ, बंद अवस्थेतील पथदिवे व हायमास्ट, दुकानदारांनी अवैधरित्या अडवलेली मार्जिनल स्पेस, पदपथ व रस्ते अडवून बसलेले अनधिकृत फेरीवाले व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कधीही न पाहवयास मिळणारी औषध व धूर फवारणी, उद्यानांची व मैदानांची झालेली दुरावस्था व विद्रुपीकरण, अनधिकृत गॅरेजेस व त्यांची रस्त्यांवरील बेवारस वाहने, विभागात सुसज्ज ग्रंथालय नसणे, ऐरोली स्थानकाजवळील अनधिकृत पार्कींग, उघडी पडलेली गटारे, सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था, रस्त्यांच्या नामफलकांची दुर्दशा, ऐरोली सेक्टर-३ येथील शुक्रवार बाजार त्वरित बंद करणे, ऐरोल दिघा येथील सर्व उद्यानांची गेट, खेळणी व लाईटची दुर्दशा, चिंचपाडा यादव नगर येथे घरपट्टी वेळेवर न मिळणे, तसेच तेथील नाल्यांची साफसफाई, गरिबांच्या घरांवर कारवाई मात्र इतरांच्या घरांना अभय या व अशा अनेक समस्यांमुळे नागरिक बेजार झाल्याचे मनसे विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी व प्रमोद मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या नागरी समस्यांकडे महानगरपालिका जाणीवपूर्वक
दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. यामध्ये
कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे देखील असल्याची शंका मनसेने व्यक्त केली आहे.
तरी या समस्या येत्या आठ दिवसांच्या आत मार्गी न लावल्यास महापालिका व
अधिकाऱ्यांविरोधात खळ-खट्टयाक आंदोलन करण्याचा इशारा उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले
यांनी दिला आहे.
याप्रसंगी मनसेची आक्रमकता पाहून विभाग अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत
मनसेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश
बाणखेले, विनोद पार्टे, सविनय म्हात्रे, सचिव रुपेश कदम, सहसचिव धनंजय भोसले,
नितीन लष्कर, विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी, प्रवीण घोगरे, प्रमोद मोरे, भूषण
आगीवले, उप विभाग अध्यक्ष कल्पेश बेलोशे, अक्षय अंडागळे, संदीप सिंग, तसेच
विद्यार्थी सेनेचे सनप्रीत तुरमेकर, सचिव प्रेम दुबे, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र
उपाध्यक्ष नितीन खानविलकर, चिटणीस जमीर पटेल, जनहित कक्ष शहर अध्यक्ष चंद्रकांत
महाडिक, मनसे शारीरिक सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष सागर नाईकरे व मोठ्या संख्येने
महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.