सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सध्याचे कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने कर्करोगाची लक्षणे आढळलेल्या महिलांसाठी टप्प्याटप्प्याने सर्व १११ प्रभागांमध्ये कर्करोग निदान शिबिराचे आयोजन केले असून या तपासणीमध्ये कर्करोगाचे निदान झाल्यास आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या पुढील उपचारासाठीही मदत करण्याचा प्रयत्न असेल असे मत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी ‘कर्करोगमुक्त नवी मुंबई’ असण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
शिरवणे नागरी आरोग्य केंद्रात नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दि. १६ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व १११ प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या महिला कर्करोग निदान शिबिराचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी उप महापौर मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेता रविंद्र इथापे, आरोग्य समितीच्या सभापती शशिकला पाटील, नगरसेविका अनिता मानवतकर, अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील, समाज विकास विभागाच्या उप आयुक्त क्रांती पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, इंडियन कॅन्सर सोसायटीचे डॉ. अर्जुन शिंदे, डॉ. पटवर्धन, डॉ. विशाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर मात करून बऱ्या झालेल्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा शुभांगी तिरोड़कर यांनी कर्करोग निदान झाल्यावर खचून न जाता त्यावर योग्य उपचार घेतल्यास कर्करोगावर मात करता येते व सामान्य जीवन जगता येते हा स्वत:चा अनुभव असल्याचे सांगत उपस्थित महिलांचे मनोबल वाढविले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात नागरी आरोग्य केंद्र, शिरवणे (प्र.क्र. ८१), नमुंमपा शाळा क्र. ४६ गोठीवली गांव (प्र.क्र. २४), समर्थ हेल्थ केअर, सेक्टर १९ ए नेरूळ (प्र.क्र. १००) याठिकाणी शिबिरे संपन्न झाली. त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला.
यापुढील काळात १८ जानेवारी रोजी नागरी आरोग्य केंद्र दिघा (प्र.क्र. ०९), गणपतीपाडा दिघा (प्र.क्र. ०३), विष्णुनगर दिघा (प्र.क्र. ०४) येथे शिबिरे होणार आहेत.
२५ जानेवारी रोजी तुर्भे गांव अंगणवाडी (प्र.क्र. ७२), आग्रोळी सेक्टर २९ समाजमंदीर (प्र.क्र. १०१), नागरी आरोग्य केंद्र नेरुळ फेज १ (प्र.क्र. ८०) येथे शिबिर संपन्न होत आहे.
२६ जानेवारी रोजी चंद्राबाई चौगुले शाळा चिंचपाडा ऐरोली (प्र.क्र. ०७) येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ जानेवारी रोजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांचा दवाखाना सेक्टर ४ सी.बी.डी. बेलापूर (प्र.क्र. १०४), नागरी आऱोग्य केंद्र करावे (प्र.क्र. ११०) व डॉ. डिसूजा क्लिनिक खैरणे (प्र.क्र. ४२) येथे शिबिरे होणार आहेत.
२८ जानेवारी रोजी डॉ. काटकर क्लिनिक खैरणे (प्र.क्र. ४३), नागरी आरोग्य केंद्र नेरूळ फेज १ (प्र.क्र. ८८) आणि ज्येष्ठ नागरिक भवन सेक्टर ११ नेरूळ (प्र.क्र. ९०) येथे कर्करोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
२९ जानेवारी रोजी माता बाल रुग्णालय तुर्भे (प्र.क्र. ६६), तेरणा क्लिनिक तुर्भे स्टोअर (प्र.क्र. ७०) आणि नागरी आरोग्य केंद्र चिंचपाडा (प्र.क्र. ०८) येथे निदान शिबिर होत आहे.
३१ जानेवारी रोजी रामनगर अंगणवाडी (प्र.क्र. ०२), प्रवोधनकार ठाकरे विद्यालय इलठनपाडा (प्र.क्र. ०५) व यादवनगर बुध्दविहार (प्र.क्र. ०६) याठिकाणी शिबिर होणार आहे.
प्रत्येक शिबिरामध्ये १०० महिलांची कर्करोगाच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी करण्यात येत असून महिलांमध्ये आढळलेल्या मुख कर्करोग, गर्भाशय तोंडाचा कर्करोग, स्तन कर्करोग याच्या लक्षणांनुसार प्राधान्याने तपासणी करण्यात येत आहे.
प्रत्येक शिबिरात १०० महिलांची तपासणी करण्यात येणार असली तरी त्यामध्ये महिलांची संख्या वाढल्यास त्यांचीही तपासणी करावी असे निर्देश महापौर जयवंत सुतार यांनी दिले व नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या या महत्वपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.