सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून राजकीय कलगीतुरा सुरू झालेला आहे. वादाचे मुळ दिल्लीत असले तरी त्यांचा आगडोंब महाराष्ट्राच्या राजकारणात उफाळून आलेला आहे. दिल्लीतील भाजप कार्यालयात धार्मक व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मुळातच जयभगवान गोयल या मूर्ख माणसाला कळाले पाहिजे की महाराष्ट्रातील भूमीवर स्वराज्याची स्थापना करून त्या स्वराज्याची जगाला दखल घ्यायला लावणाऱ्या शिवछत्रपतींची तुलना कोणत्याही युगात कोणाशीही होणे संभवच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एक भव्यदिव्य व अलौकीक असे व्यक्तिमत्व आहे. परंतु महापुरूषांच्या नावाचा आधार राजकारणात व समाजव्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण करून आपल्याकडे प्रसिध्दीचा झोत वळवून घ्यायचा, ही घातक प्रवृत्ती अलिकडच्या काळात समाजामध्ये वाढीस लागली आहे.
नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी जयभगवान गोयल यांनी हे बालिश व घृणास्पद कृत्य केले. या कृत्याच्याविरोधात महाराष्ट्राच्या मातीवर तीव्र व संतप्त पडसाद उमटणे स्वाभाविकच आहे.काही वेळातच भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तसेच सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त होवू लागला. मोदी व भाजप महाराष्ट्रातील जनतेकडून टीकेचे धनी व्हावे लागले. सोशल मिडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अखेरीला भाजपच्या प्रकाश जावडेकरांना पुस्तक मागे घेत असल्याची घोषणा करावी लागली. हा वाद तेथेच खऱ्या अर्थाने समाप्त होणे गरजेचे होते. परंतु वाद लगेच संपला तर राजकारणातील प्रसिध्दीचा झोत आपणाकडे राहणार नाही ही गोष्ट काही धुर्त राजकारण्यांनी वेळीच ओळखली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे त्यातीलच एक आहेत. त्यांनी शिवसेनेकडून निषेध करणे, संताप व्यक्त करणे समजण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील भूमीवर जन्माला आलेला कोणीही माणूस शिवछत्रपतींची अन्य कोणाबरोबर तुलना सहन करूच शकणार नाही. हे समजताच मुठ्या आवळल्या जाणे, शरीरातील रक्त उसळून येणे ही कृती महाराष्ट्रातील प्र्रत्येक माणसामध्ये दिसून आली.
संजय राऊत हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चलनी नाणे आहे. महाशिवआघाडीचे सरकार सत्तेवर येण्यात व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसविण्यात संजय राऊतांचे निश्चितच योगदान आहे. त्यांनी शिवसैनिक म्हणून त्यांचे कर्तव्यच पार पाडले आहे. परंतु पुस्तकाचा व लेखकाचा निषेध करून संजय राऊतांनी थांबणे आवश्यक आहे. वाव वाढवून प्रसिध्दी न मिळविता कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न तर निर्माण होणार नाही याचे भान आजच्या काळात सुज्ञ राजकारण्यांची बाळगणे आवश्यक आहे. परंतु ते भान बाळगण्याचे तारतम्य सध्या राजकारण्यांमध्ये दिसून येत नाही. समाज दुभंगला तरी चालेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी चालेल, पण मला प्रसिध्दी मिळाली पाहिजे, मी चर्चेत राहीले पाहिजे ही विकृती अलिकडच्या काळात राजकारण्यांमध्ये वाढीस लागली आहे.
संजय राऊतांनी भाजपमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना नाहक यात ओढवून घेतले. छत्रपतींच्या वंशजांनी म्हणजेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे शिवेंद्रराजे, उदयनराजे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असती. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी म्हणून संजय राऊतांनी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली आणि त्यातूनच हा वाद चिघळत गेला. छत्रपती संभाजीराजेंनी वास्तविक आपली भूमिका तात्काळ स्पष्टही केली होती. शब्दांनी शब्द वाढत गेला.संजय राऊतांनी तर थेट उदयनराजेंना छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे घेवून या म्हणण्याचे धाडस दाखविले. सांगली बंदमध्ये संजय राऊतांच्या विरोधात तेथील स्थानिक जनतेचा आक्रोश व उद्रेक दिसून आला. मुळात हा वाद ज्या ठिकाणाहून सुरू झाला, त्या दिल्लीमध्ये या वादाचे कोठेही पडसाद उमटले नाहीत. परंतु राजकीय युध्द मात्र महाराष्ट्राच्या कुरूक्षेत्रावर लढले जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय वादामध्ये सर्वसामान्य भरडला जाण्याची भीती आहे. भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्यावर व पुस्तक मागे घेतल्यावर वाद चघळण्यात काहीही अर्थ नव्हता. मुळातच या वादामुळे विकृत मानसिकतेच्या वेदप्रकाश गोयलला नाहक प्रसिध्दी मिळाली. महाराजांबाबत आदर व्यक्त करणाऱ्या संजय राऊतांनी यापूर्वी त्यांच्या लिखाणामध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचे प्रकरण उजेडात आले. वड्याला शिववडा नाव देताना शिवछत्रपतींचे महात्म्य शिवसेनेला ठाऊक नव्हते काय? हा मुद्दा नव्याने उजेडात आला. अनेक मुद्दे यानिमित्ताने उजेडात येत आहे. प्रश्न हा निर्माण होतो की, या वादातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे? शिवछत्रपतींच्या विचारांना व कार्याला काय गती मिळणार आहे? तर काहीच नाही. राजकीय स्वार्थासाठी व प्रसिध्दीसाठी राजकारण्यांनी हा खेळ सुरू केला आहे. हा खेळ आता थांबविणे आवश्यक आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी शिवछत्रपतींच्या नावाचा वापर करणे आता थांबवा. शिवछत्रपतींचे नाव घेवूनच महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतलेली आहे. सत्ता मिळविलेली आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील जनतेचे श्रध्दास्थान आहे. आराध्यदैवत आहे. त्या नावाचा वापर करण्याची कुणालाही मक्तेदारी नाही. ज्या शिवछत्रपतींनी स्वराज्य मिळविले, महिलांना मानसन्मानाची वागणूक दिली, त्या छत्रपतींच्या नावावरून राजकारण करणे आता थांबवा हे महाराष्ट्रातील जनतेनेच राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची योग्य वेळ आलेली आहे.
- सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com