नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील फरक एकूण ९० कोटी रुपयांची थकबाकी दया अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील फरक एकूण ९० कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर करत नाही आहे. यासंदर्भात मनसेची भूमिका ठरविण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद बोलावली होती. कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेकडून सातत्याने महापालिका प्रशासनाकडे प्रयत्न केले जात आहेत. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासकीय बाबी पूर्ण केल्यानंतरही सत्ताधारी असलेल्या भाजपकडून जाणीवपूर्वक कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समिती ३ वेळा मंजूर करण्यात आलेला नाही. सत्ताधारी असलेल्या नाईक कुटुंबीयांनी कंत्राटी कामगारांचे संपूर्ण श्रेय घ्यावे. परंतु, कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे द्यावेत अशी विनंती संदीप देशपांडे यांनी यावेळी केली. कंत्राटी कामगारांना त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर येत्या २७ जानेवारीला एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या एकदिवसीय कामबंद आंदोलनामुळे नवी मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केली. कंत्राटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन समस्त नवी मुंबईकरांनी info@nmmconline.com या ईमेल आयडीवर जास्तीत जास्त मेल करून कंत्राटी कामगारांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, मनसेचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, सचिन आचरे, शहर सहसचिव दिनेश पाटील, महिला सेनेच्या शहर अध्यक्षा डॉ.आरती धुमाळ, उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष अमोल आयवळे, चिटणीस गजानन ठेंग, सहचिटणीस संजय सुतार, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन खानविलकर, सुरेश मढवी, विनोद पाखरे, प्रशांत शिंदे हे उपस्थित होते.