अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात नवी मुंबई कार्यक्षेत्रात इयत्ता पहिली ते पदवीपर्यतच्या तसेच अन्य व्यवसाय अभ्यासक्रमांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. परंतु या वर्षी अनेक पालकांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची समस्या निर्माण झाल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नेरूळ पश्चिमच्या प्रभाग ९६च्या भाजप नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून इयत्ता पहिली ते पदवीपर्यत तसेच अन्य अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येत असते. ही खरोखरीच आम्हा नवी मुंबईकरांसाठी अभिमानास्पद बाब असून महापालिका प्रशासन शैक्षणिक कार्यात हातभार लावून करदात्या नागरिकांची काळजी घेत असल्याचे स्पष्ट होते. यंदाही या शिष्यवृत्तीसाठी पालिका प्रशासनाने अर्ज वितरीत केले असून अर्ज दाखल करण्याची ३१ जानेवारी २०२० ही अंतिम तारीख आहे. तथापि या शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करण्यासाठी पालकांनी उत्पन्नाचा अर्ज सादर करणे आवश्यक असते. नेरूळ नोडमध्ये अधिकांश पालकांनी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी शासनाकडे अर्ज केला असून त्यांना अजून दाखला मिळालेला नाही. दाखला कधी मिळेल याचेही संबंधितांकडून निश्चित उत्तर दिले जात नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्यास विलंब झाल्यास अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकण्याची शक्यता असल्याची भीती नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे शिष्यवृत्तीचा मुळ उद्देशालाच हरताळ फासला जावून अनेक कररदात्या पालकांच्या पदरी निराशा येण्याची शक्यता अहे. नेरूळ नोडमधील अधिकांश पालकांनी उत्पन्नाच्या दाखल्यास होत असलेल्या विलंबाची समस्या आमच्यासमोर मांडली आहे. नवी मुंबईकर जनता व प्रशासन यामधील मध्यस्थ, समन्वयक या नात्याने संबंधितांची कैफीयत मी आपणासमोर मांडत असून शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अजून किमान १५ दिवसाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.