अनंतकुमार गवई
सारसोळे गावच्या मनोज मेहेरांची महापौर, आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने नवी मुंबईतील ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना
महापालिका प्रशासनाने पाणी पट्टी, मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी सारसोळे गावचे युवा
ग्रामस्थ आणि कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका
आयुक्तांकडे व महापौरांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
शासकीय गरजेतून नवी मुंबई शहराची निर्मिती झालेली आहे. येथील ग्रामस्थ मासेमारी व भातशेतीवर आपली उपजिविका करत होता. भूसंपादनात ग्रामस्थांची भातशेती हिरावून घेतली गेली. खाडी दूषित झाल्याने व खाडीवर पुलाची उभारणी झाल्याने मासेमारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई विकसित झाले, पण येथील ग्रामस्थांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. जमिनी देवून नवी मुंबई वसविण्यात सहकार्य केले, त्याच ग्रामस्थांची परिस्थिती आज भयावह आहे. प्रशासनाकडून ग्रामस्थांना घरटी रोजगार मिळालेला नाही. साडे बारा टक्के योजना पूर्ण करण्यास तब्बल ५ दशके घेतली. आज येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने बेरोजगार आहे. बाहेरून आलेल्यांच्या अनधिकृत चाळी व इतर बांधकामांना अधिकृत करून नियमित केेले जात असतानाच ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर मात्र अतिक्रमणाच्या नावाखाली हातोडा चालविला जात आहे. ग्रामस्थ आज जगण्यासाठी संघर्ष करत आहे. आज महापालिका प्रशासन गेल्या दीड दशकाहून अधिक काळ मालमत्ता कर व पाणी पट्टीत वाढ करत नाही. ही स्तुत्य बाब आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या विकासात ज्यांचे योगदान आहे. ज्यांच्या शेतजमिनी गेल्या. बेरोजगारी तर आहेच, पण गरजेपोटी बांधलेल्या घरांवरही हातोडा चालविला जावू लागल्याने बेघर होण्याची वेळ आता आलेली आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाकडून नवी मुंबईतील ग्रामस्थांचा, प्रकल्पग्रस्तांचा, मूळ आगरी-कोळी समाजबांधवांचा कोठेतरी गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. नवी मुंबईचे मूळ भुमीपुत्र असणाऱ्या ग्रामस्थांना मालमत्ता कर व पाणीपट्टीत पूर्णपणे सवलत मिळून तो कायमस्वरूपी माफ करण्यात यावा अशी मागणी मनोज मेहेर यांनी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, महापौर जयवंत सुतार यांच्याकडे केली आहे.