अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नाशिकच्या बोरगड परिसरात अवतरला मानवतेचा कुंभमेळा
नाशिक: “चला, आपण आपले जीवन कृतज्ञतेच्या भावनेने सजवु या. निराकार प्रभुने आम्हाला दिलेले हे जीवन ही एक अमूल्य देणगी आहे. ईश्वर आम्हाला शक्य असलेले सर्वोत्तम तेच प्रदान करत असतो. आम्हाला प्रभुइच्छेमध्ये राहता आले पाहिजे आणि त्याच्या प्रति कृतज्ञतेचा भाव हृदयामध्ये धारण करता यावा.” असे प्रतिपादन सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या ५३व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना केले.
नाशिकच्या बोरगड परिसरामध्ये आयोजित हा संत समागम म्हणजे जणू मानवतेचा कुंभमेळा आहे असा आभास होत आहे. या कार्यक्रमामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशविदेशातून लाखोंचा जनसागर लोटला आहे.
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की कृतज्ञतेचा भाव धारण केल्याने आमच्या अंतरात शांती नांदू लागते. आपण सहनशीलता, क्षमाशिलता, सद्व्यवहार आणि प्रेम यांसारखे दिव्य गुण धारण करुन आपले जीवन सहज-सुंदर बनवू शकतो.
त्यांनी पुढे प्रतिपादन केले, की परमात्मा आदि-अनादी आहे. त्याचा कधी प्रारंभ झाला नाही आणि कधी अंतही होणार नाही. या ईश्वराला पाण्याने भिजवता येत नाहीं किवा त्याचे तुकडे करता येत नाहीत. परमात्मा स्थिर आहे आणि जेव्हा आपण त्याच्याशी नाते जोडतो तेव्हा आपल्याही जीवनात स्थिरता प्राप्त होते आणि सुख-दु:खाच्या पलिकडे जाऊन आनंदाच्या अवस्थेमध्ये आपण स्थित होतो. पुरातन गुरु-पीर-पैगंबर आणि पवित्र ग्रंथांमधील वाणीनुसार संत निरंकारी मिशनही मागील ९० वर्षांपासून हा संदेश जगाला देत आहे.
सद्गुरु माताजी म्हणाल्या, की प्रभु-परमात्म्याची प्राप्ती करणे हा जीवनाचा मुख्य उद्देश आहे. ही संधी आपण गमावता कामा नये. जर आपण तसे केले नाही तर आपले हे अमूल्य जीवन वृथा जाईल. भौतिक जगताच्या आकर्षणामध्ये आपण गुंतू नये. आपण आपले स्वत:चे जीवन उज्वल बनवून इतरांसाठीही महत्वपूर्ण योगदान द्यावे.
या समागमामध्ये भाविक-भक्तगण रेल्वे, बस, मोटारी व इतर पब्लिक ट्रान्सपोर्टच्या साधनांनी समागम स्थळावर पोचत आहेत. त्यांच्या आगमनामुळे नाशिकवासियांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी सुरळीत वाहतूकीचे उचित प्रबंध करण्यात आले आहेत.
समागमाच्या पहिल्या दिवशी देश-विदेशातून आलेल्या वक्त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, अहिराणी, कन्नड, सिंधी, बंजारा, भोजपुरी, पंजाबी, बंगाली आणि नेपाळी इत्यादी भाषांतून विचार, भजने, भक्तिरचना, कविता आदि माध्यमांतून आपले भाव व्यक्त केले.
- सेवादल रॅली
समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ रंगीबेरंगी आणि रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला. सेवादलाच्या हजारो पुरुष व महिला स्वयंसेवकांनी या रॅलीमध्ये आपापल्या गणवेषामध्ये भाग घेतला. हे सेवादल स्वयंसेवक सत्संग समारोह, संत समागम यांच्या व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावतातच शिवाय मिशनच्या देश-विदेशातील सामाजिक कार्यामध्ये आपले मोलाचे योगदान देतात. यापुढेही मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित राहण्यासाठी त्यांनी पुनर्प्रतिज्ञा करुन सद्गुरु माताजींच्या आशीर्वादांची कामना केली. शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीकोनातून त्यांनी कवायत केली. अनुशासन, शिस्त, समर्पण व सहयोगाची भावना अंगी बाणवण्यासाठी त्यांनी काही खेळ, तसेच मानवाकृति मनोरे सादर केले. सेवा हे भक्तीचे महत्वपूर्ण अंग असल्याचे दर्शविणारे तसेच सेवादल स्वयंसेवकांनी आपल्या वरिष्ठांचे व विशेषत: सद्गुरुंच्या आदेश-उपदेशांचे पालन करण्याची प्रेरणा देणारे काही कार्यक्रमही या रॅलीमध्ये सादर केले गेले.
सेवादल रॅलीला आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या की, सेवादल स्वयंसेवक आपल्या विविध प्रकारच्या सेवा केवळ समागमामध्येच नव्हे तर इतरत्रही त्यांना जिथे जिथे सांगितले जाईल तिथे तिथे अनुशासनबद्ध राहून, समर्पित भावनेने आणि सजगतेने देत असतात. सेवादल स्वयंसेवक सदैव मिशन आणि समाजाचीच नव्हे तर संपूर्ण मानवतेची सेवा करण्यामध्ये तत्पर असतात. विशेषत: देशात कोणत्याही ठिकाणी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये हे सेवादल बचाव व पुनर्वसन कार्यासाठी आपल्या निष्काम सेवा प्रदान करत असतात.
तत्पूर्वी संत निरंकारी मंडळाचे सेवादलाचे मेंबर इंचार्ज श्री.व्ही.डी.नागपाल यांनी सांगितले की, जिथे कुठेही सेवेसाठी बोलाविले जाईल तिथे आपल्या सेवा समर्पित करण्यासाठी सेवादल स्वयंसेवक निरंतर तत्पर असतात. तथापि, अजुनही त्यांच्यामध्ये अनेक कमतरता असू शकतात, तेव्हा सद्गुरु माताजींनी त्यांना क्षमादान देऊन आपले आशीर्वाद प्रदान करावेत, जेणेकरुन ते त्यांच्या सेवा अनुशासन, सहयोग, पूर्ण समर्पण आणि भक्तीभावाने निभावू शकतील.