श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडकोचे आयोजन
बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंची संकल्पना
नवी मुंबई : गेली नऊ दिवस चालत आलेल्या या महोत्सवाने नवी मुंबईकरांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते या महोत्सवाला सुरुवात झाली होती.
विविध स्टॉल्स, आकाशपाळणा, विविध प्रकारची खेळणी, खवय्यांच्या आवडीचे चमचमीत पदार्थ आणि त्यावर ताव मारणाऱ्या नवी मुंबईकरांसाठी आणि बच्चेकंपनीसाठी एक प्रकारची मेजवानीच होती. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महिलांकरिता हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सायलीज आर्ट झोनच्या वतीने लहान मुलांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रसिद्ध लावणी कलावंत अष्मिक कामठे यांच्या लावणीने या महोत्सवाला चार चांद लावले गेले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुंदर नवी मुंबई-स्वच्छ नवी मुंबई या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर सदाबहार लावण्यवतींचा नृत्य जल्लोष सोहळाही लावण्यवतींच्या दिलखेचक अदांनी आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी समूह नृत्य (खुला वर्ग), वेशभूषा आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मुलींनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित नृत्याविष्काराने उपस्थित नागरिकांची मने जिंकली. महोत्सवाच्या चौथा दिवशी चित्रकला स्पर्धेचा आणि आंतरशालेय समूहनृत्य स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. महोत्सवाच्या पाचव्या दिवशी आम्ही दोघे राजा राणी-खेळ पैठणीचा या खेळाणे आणखीनच रंगत आणली. नवदाम्पत्यांपासून ते जेष्ठांच्या जोड्यांनी या कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेऊन कार्यक्रमात वेगळेच रंग भरले. हसत खेळत वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
महोत्सवाचा सहावा दिवस प्रसिद्ध गायक आणि संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्रसिद्ध उद्योगपती दीपक बैद, गायिका युक्ता पाटील, जिवाभावाचा वॉट्सअँप ग्रुपचे पदाधिकारी, सायलीज आर्ट झोनच्या सायली राऊळ, लावणी कलावंत अष्मिक कामठे,, हरयाणा असोसिएशनचे बलबीर चौधरी आणि सहकारी, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियनचे प्रताप मुदलियार यांचा यावेळी पद्मश्री शंकर महादेवन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
नवी मुंबईत असे कार्यक्रम होत आहेत याचा खूप आनंद होतो. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे हा माझ्यासाठी नेहमीच सन्मान असतो. मी नवी मुंबईकर असल्याचा अभिमान आहे. मी नवी मुंबईकर आहे आणि यापुढेही राहीन असे प्रतिपादन यावेळी शंकर महादेवन यांनी केले. उपस्थित प्रेक्षकांच्या आग्रहास्तव शंकर महादेवन यांनी श्री गणेशाचे आणि देशभक्तीपर गाणे सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. महोत्सवाचा सातवा दिवस मोठया उत्साहात पार पडला. यावेळी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला नवा रंग आणला. कॉमेडी एक्सप्रेस या हास्यकल्लोळ मनोरंजनाच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शंख, सकाळची प्रहर, चिमण्यांचा किलबिलाट, रेल्वे इंजिन, लहान मुलीच्या पैंजणांची छमछम असे विविधरंगी आवाज कलाकारांनी सादर करून प्रेक्षकांची माने जिंकली. या कार्यक्रमाबरोबरच लावणीचा फडही गाजला. महोत्सवाच्या सातव्या दिवसाचा सोहळा नागरिकांच्या उपस्थितीने अधिकच रंगतदार होत गेला. काल पार पडलेल्या मेहंदी स्पर्धेच्या कार्यक्रमाचा पुरस्कार वितरण सोहळाही आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महोत्सवाचा आठव्या दिवशी वंदे मातरम या कार्यक्रमांतर्गत महामानवांना अभिवादन करणारी गाणी यावेळी गायकांनी सादर केली. देशभक्तीपर गाण्यांनी उपस्थित नागरिकांमध्ये नवी चेतना जागवली. नेरूळच्या विद्या भवन शाळेत इयत्ता नववीत शिकत असलेली कु. नीलम प्रसाद तरकसबंद हिने छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आपल्या तडाखेबंद भाषणात हुबेहूब जिवंत केला. आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांनी कु. नीलम हिचे अभिनंदन केले. तर गायक चंद्रकांत शिंदे यांनी भीमगीते आणि कव्वाली गाऊन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. चंद्रकांत शिंदे यांनी आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांच्यावर लिहिलेले स्वरचित गाणेही सादर केले. तसेच काल पार पडलेल्या पाककला स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळाही आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सोहळा दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी “रंग मराठी सणांचे” या कार्यक्रमाने संपन्न झाला. पाडवा, होळी, गणेशोत्सव, मंगळागौर, वासुदेवाची भूपाळी, गोकुळाष्टमी, नवरात्र, विठ्ठलवारी, धनगर समाजाचे पारंपरिक गीत असे विविध सण आणि त्याचे महत्व कलाकारांनी आपल्या सुरेख अदांनी आणि नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांसमोर सादर केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. गेली नऊ दिवस रंगणाऱ्या या महोत्सवाची आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांच्या उपस्थितीत गोड सांगता झाली.
तसेच सकाळी पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात ७२१ नागरिकांनी लाभ घेतला असून ३१० नागरिकांना मोफत चष्मे व औषधे वाटप करण्यात आली. तसेच सदर महोत्सवात लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन, रिलायन्स हॉस्पिटल, आचार्य श्री नानेश हॉस्पिटल, युनीकेअर हेल्थ, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांनी सहभाग घेतला होता. सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी,कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नवी मुंबईकरांचे या महोत्सवाला लाभलेल्या योगदानाबद्दल आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले. गेली नऊ दिवस नागरिकांनी केलेले सहकार्य न विसरण्यासारखे आहे. नवी मुंबईकरांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. असेही ते यावेळी म्हणाल्या. श्री गोवर्धनी सामाजिक सेवा संस्था आणि सिडको आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक, कला आणि क्रीडा महोत्सवाचा सांगता सोहळा उत्साहात पार पडला.