नवी मुंबई : प्रवाशांचे हित नजरेसमोर ठेवून सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटी ५२६ बसेसच्या माध्यमातून दक्षतेने कार्यरत आहे. यादृष्टीने प्रवासी सेवेत भर टाकणारा आणि नवी मुंबईतून मुंबईत जाणा-या प्रवाशांकरिता उपयोगी असा वाशी रेल्वे स्थानक ते घाटकोपर रेल्वे स्थानक (पश्चिम) अशा नवा वातानुकुलीत बसमार्गाचा शुभारंभ भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या सन्माननीय उपस्थितीत वाशी रेल्वे स्टेशन बसस्थानकात संपन्न झाला.
याप्रसंगी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, आरोग्य समितीच्या सभापती शशिकला पाटील, नगरसेवक गणेश म्हात्रे, फशीबाई भगत, परिवहन समिती सदस्य अब्दुल जब्बार खान, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, परिमंडळ उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड, परिवहनचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे उपस्थित होते.
वातानुकुलीत असा हा नवा बस मार्ग क्र. १२७ वाशी रेल्वे स्थानकापासून कोपरखैरणे, एमबीपी महापे, घणसोली नाका, सेक्टर ५ ऐरोली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली टोल नाका, भांडुप पंपींग स्टेशन, टागोर नगर जंक्शन, गांधीनगर, हिंदुस्तान कंपनी, गोदरेज कंपनी, श्रेयस सिनेमा ते घाटकोपर रेल्वे स्थानक (प.) असा असणार आहे. साधारणत: २९ किमीचे हे अंतर पार करण्यासाठी ९० ते १०० मिनिटे इतका कालावधी अपेक्षित आहे. सकाळ, संध्याकाळ ३० ते ४० मिनिटे अंतराने या बस उपलब्ध असणार असून वाशी रेल्वे स्थानकातून पहिली बस सकाळी ७ वा. तसेच शेवटची बस सायंकाळी ८.२० वाजता सुटणार आहे. घाटकोपर रेल्वे स्थानक (पश्चिम) येथून पहिली बस सकाळी ८.३० वाजता तसेच शेवटची बस रात्री १० वाजता सुटणार आहे. विशेषत्वाने या बसद्वारे मेट्रोने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना चांगली संलग्नता उपलब्ध होणार आहे.१२७ क्रमांकाचा हा नवा बसमार्ग ६२ वा असून त्याचा शुभारंभ नव्या इंधनरहित इलेक्ट्रिकल बसेसमध्ये व व्होल्वो बसमध्ये करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी बसचा काही अंतर प्रवासही केला.