- विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांनी पालिका आयुक्तांना दिले निर्देश
- वेळ पडल्यास कॅबिनेटचे व नगरविकासचे सर्व सहकार्य देण्याचे नाना पटोळेंची ग्वाही
- रवींद्र सावंत यांच्या प्रयत्नांमुळे ठोक मानधनावरील कामगारांना येणार ‘अच्छे दिन’
नवी मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कामगारांना सेवेत कायम करण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले असून कामगारांच्या हितासाठी महापालिका प्रशासनाला कॅबिनेटचे व नगरविकास खात्यांकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही नाना पटोळे यांनी दिले. नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या विधानभवनातील दालनात झालेल्या विशेष बैठकीचे महापालिका प्रशासन व नगरविकास खाते तसेच कामगार प्रतिनिधी म्हणून इंटकलाही नाना पटोळे यांनी सहभागी करून घेतले होते.
या बैठकीला विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, महाराष्ट्र सरकारचे अवर सचिव नवनाथ वाठ, कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर व कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश लाड, नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, नगरविकास मंत्र्यांचे खासगी सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, उपसचिव तसेच महापालिका प्रशासनाचे किरण यादव उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला नाना पटोळे यांनी ठोक मानधनावरील काम करणाऱ्या पालिका प्रशासनातील कामगारांची सेवा कायम झाली पाहिजे, ती कशी करता येईल, याबाबत महापालिका प्रशासनाने काम करावे असे स्पष्ट करत सकारात्मक प्रतिसाद देत चर्चेचा शुभारंभ केला. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी तांत्रिक अडचणीचा उहापोह करताच इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका ही श्रीमंत महापालिका असल्याचे सांगत ठोक मानधनावरील कामगारांची सेवा कायम झाल्यास पालिका प्रशासनावर कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नसल्याचे स्पष्ट केले. या कामगारांना कोठेही कर्ज मिळत नसून पालिका सेवेत काम करताना वयोमर्यादाही निघून गेल्याने त्यांना अन्यत्र कोठे नोकरीही मिळणार नाही. त्यामुळे त्यांची महापालिका प्रशासनात सेवा कायम होणे आवश्यक असल्याचे सांगत नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी ठोक मानधनावरील कामगारांच्या समस्या बैठकीत निदर्शनास आणून दिल्या.
नाना पटोळे यांनी महापालिका आयुक्तांना तांत्रिक अडचणी सांगून कामगारांची ससेहोलपट करू नका. या कामगारांची सेवा कायम करण्यासाठी तातडीने हालचाल करा. तुम्हाला मंत्रालयीन पातळीवरून तसेच नगरविकास खात्यांकडून सर्व सहकार्य मिळेल. धोरणात्मक निर्णयाची मदत हवी असल्यास कॅबिनेटकडूनही सहकार्य दिले जाईल, असे यावेळी स्पष्टपणे बजावले.
या बैठकीत पालिका प्रशासनात काम करणाऱ्या रोजंदारीवरील कामगारांच्या समस्यांचा,पालिकेतील शिक्षण विभागाचे शिक्षक ,आरोग्य विभागातील सर्व विभागातील कामगार ,योजना विभागातील कर्मचारी ,सर्व विभागातील कर्मचारी, परिवहन विभागातील कामगारांच्या समस्येचाही मुद्दा रवींद्र सावंत यांनी नाना पटोळे यांच्यासमोर मांडताच पटोळे यांनी याही कामगारांच्या समस्या निवारणासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले.
ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांना सरसकटपणे एकाच ठेकेदाराच्या माध्यमातून ठेक्यात सामावून घ्यायचे या महापालिका प्रशासनाच्या सुरू असलेल्या हालचालीही रवींद्र सावंत यांनी नाना पटोळे यांच्यासमोर मांडताच त्यांनी ठोक मानधनावरील कामगार ठेकेदाराच्या हाताखाली काम करणार नाहीत असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्तांना दिले. यावर पालिा आयुक्तांनी ते मान्य करत या कामगारांची सेवा कायम होईपर्यत ते कोणत्याही ठेकेदाराकडे काम करणार नसल्याचे बैठकीत सांगितले.
नाना पटोळे यांनी मंत्रालयीन पातळीवरून सर्व सहकार्य करण्याचे व वेळ पडल्यास कॅबिनेटमध्ये विषय मांडून मंजूर करण्याचे आश्वासन दिल्याने ठोक मानधनावरील कामगारांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कायम सेवेबाबत आता आशावाद व्यक्त केला जावू लागला आहे. इंटक संघटना कायम सेवेसाठी मंत्रालयीन पातळीवरही पाठपुरावा व संघर्ष करत असल्याचे निदर्शनास आल्याने कामगार वर्गाकडून रवींद्र सावंत यांचे आभार मानून अभिनंदनही केले जात आहे.