सारसोळे प्रवेशद्वारावर कमानीसाठी मनोज मेहेर यांचा २०१३ पासून जनता दरबार, मंत्रालय, महापालिकेकडे पाठपुरावा
नवी मुंबई : सारसोळे प्रवेशद्वारावर बांधण्यात येणाऱ्या कमानीवर आगरी-कोळी संस्कृतीचे प्रतिकृती लावण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सारसोळे गावाच्या प्रवेशद्वारावर कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावर कमानीचे (वेशीचे) काम नुकतेच चालु आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मनोज मेहेर यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. २०१३पासून आम्ही ग्रामस्थ गावाची ओळख म्हणून प्रवेशद्वार असावे म्हणून तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, पालिका आयुक्त, महापौर, विभाग अधिकारी कार्यालय सर्वत्र सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रभाग समितीच्या बैठकीतही सारसोळे गावचा ग्रामस्थ म्हणून ही आग्रही मागणी मांडली होती. पालिका प्रशासनाने तब्बल ७ वर्षानंतर पाठपुराव्याची दखल घेत काम सुरू केल्याबद्दल पुन्हा एकवार सारसोळे ग्रामस्थांकडून आपले आभार मानत मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाचे अभिनंदनही केले आहे.
सारसोळे गावाच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात येत असलेल्या कमानीवर (वेशीवर) तसेच कमानीमध्ये, सभोवताली गावची व ग्रामस्थांची ओळख इतरांना व्हावी यासाठी आगरी-कोळी समाजाचे प्रतिक असणारी भातशेती, मासेमारी व इतरही संस्कृतीचा, चालीरितीचा प्रतिकाच्या माध्यमातून समावेश होणे आवश्यक आहे. आपण ग्रामस्थांशी निगडीत भावनिक बाबीचा व मागणीचा विचार करून संबंधित ठेकेदाराला योग्य ते निर्देश लवकरात लवकर देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी पालिका आयुक्त व महापौरांकडे केली आहे.