अनंतकुमार गवई
……………………………………………..
गृहमंत्री अनिल देशमुख यांची कांतीलाल कडू यांनी घेतली भेट; घडली सकारात्मक चर्चा
…………………………………………
पनवेल : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातंर्गत येणाऱ्या परिमंडळ- 2 मधील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव गृहनिर्माण खात्याकडे पडून आहे. त्याला मुहूर्तस्वरूप देवून टू बिएच के आकाराच्या 245 खोल्यांचे गृहसंकुल उभारणीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पनवेल संघर्ष समितीने केले आहे.
हे गृहसंकुल उभे राहिल्यास महाराष्ट्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा तर मिळेलच, पण पनवेल तालुका पोलिस ठाण्यासमोरील आरक्षित भूखंडावर हे संकुल उभे राहिल्यास टू बिएच के घरांचे राज्यातील पोलिसांचे हे पाहिले संकुल असेल याबाबतची माहिती कडू यांनी देशमुख यांना दिली.
गृहमंत्र्यांच्या दालनात परिमंडळ -2 मधील पोलिसांच्या घराबाबत सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा रंगली होती. ना. देशमुख यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक जिचकर यांना तातडीने आदेश काढून प्रस्तावाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती मागवून घेतली आहे.
पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या तावडीतून त्या भूखंडाची सुखरूप सोडवणूक करून घेतली आहे. त्याशिवाय वास्तू विशारदाकडून संकल्पचित्र तयार करून घेतला आहे. पोलिस निवासस्थानासाठीच्या संकुलासाठी लागणाऱ्या सर्व परवानगीही काढण्यात आलेल्या आहेत. गृहसचिवांनीही हा प्रकल्प करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर तो प्रकल्प गृह निर्माण खात्याकडे धूळखात पडला असल्याची माहिती ना. देशमुख यांना दिली आहे.
गृह निर्माण खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलून पनवेल परिसरात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढावा, असे देशमुख यांना सूचित करण्यात आले.
हे गृहसंकुल उभे राहिल्यास पोलिसांना कुटुंबियांच्या समवेत वेळ घालवता येईल. कामाच्या वाढत्या तणावामुळे पोलिस असलेल्या सदस्यांची कुटुंबीयांसोबत ताटातूट होत आहे, शिवाय इतर गैरसोयीचा सामनाही त्यांना करावा लागतो. जिथे नोकरी तिथे घर दिल्यास पोलिसांची काम करण्याची क्षमतासुद्धा वाढेल आणि तणावमुक्त काम करतील, अशी माहितीही कडू यांनी ना. देशमुख यांना दिली. त्यावर देशमुख यांनी स्मितहास्य करत या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दाखवली.
त्यानंतर ना. देशमुख यांनी याबाबत अहवाल आणि संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी आढावा बैठक ते लवकच घेतील असे, पनवेल संघर्ष समितीच्या बैठकीला आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात कांतीलाल कडू, महाराष्ट्र शासनचे समाजभूषण पुरस्कार प्राप्त उत्तमराव गायकवाड, भास्कर भोईर, विजय भोईर, सचिन पाटील व महेंद्र पाटील आदींचा समावेश होता.