नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची सेवा
कायम व्हावी यासाठी नवी मुंबई इंटककडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नागपुरच्या अधिवेशनातही विधान परिषदेतही नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आमदार जोगेंद्र कवाडेंच्या माध्यमातून लक्षवेधी मांडली होती. मंत्रालयीन पातळीवर नवी मुंबई इंटक ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेबाबत करत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेण्यात आली असून २७ जानेवारी रोजी विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दालनात विशेष
बैठकीचे या विषयावर आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत हे इंटक व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम व्हावी यासाठी पालिका ते मंत्रालय पाठपुरावा करत आहेत. कामगारांच्या समस्या निदर्शनास आणून देत आहे. ठोक मानधनावरील काम करणाऱ्या कामगारांच्या कायम सेवेबाबत विधान भवनात २७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता विशेष बैठक बोलविली आहे. महाराष्ट्र सरकारचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी या बैठकीस नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, नगरविकास मंत्र्यांचे खासगी सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, उपसचिव यांनाही या विशेष बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेबाबत नागपुर अधिवेशनात विधान परिषदेत मांडण्यात आलेली लक्षवेधी, आता विधान परिषदेत त्याच विषयावर आयोजित करण्यात आलेली विशेष बैठक यामुळे सेवा कायम होण्याविषयी ठोक मानधनावरील कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेबाबत नवी मुंबई इंटकच्या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची वारंवार भेट घेवून निवेदने देवून समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ठोक मानधनावरील कामगारांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्या, कायम सेवेबाबतच्या अडचणी पाहून नाना पटोले यांनी चिंता व्यक्त करत तातडीने या समस्येवर बैठकीचे आयोजन
केल्याची माहिती रवींद्र सावंत यांनी दिली. खुद्द नाना पटोले यांनी स्वारस्य दाखवित पुढाकार घेतल्याने या समस्या निवारणाला गती मिळणार असल्याचा आशावाद रवींद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.