स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : १९७१ वर्षापासुनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणचा प्रलंबित प्रश्न आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून अखेर मार्गी लावला गेला. शासनाने नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांच्या सिटी सर्वेक्षणास बेलापूर गावामधून सुरुवातही केली. परंतु एवढ्या मोठ्या कार्याचे श्रेय ग्रामस्थांमधून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना मिळू नये, याकरिता काही नतद्रष्ट विरोधी बोगस संघटना यांनी गावातील ग्रामस्थांना खोटेनाटे सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला गेला. सिटी सर्व्हे बेलापूरमध्ये सुरु असताना सदर संघटनांनी मोर्चा काढून तो बंद केला नसता तर त्याचवेळी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळून विस्तारित गावठाणातील सर्व घरे नियमित झाली असती. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा अशा संघटना जागृत होऊन ग्रामस्थांची फसवणूक सुरु असल्याचे नवी मुंबई प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सदरचे काम झाले असून नवी मुंबईतील ग्रामस्थांना विस्तारित गावठाणातील घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असल्याने सदर कामांचे श्रेय आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना मिळू नये याकरिता सदर नतभ्रष्ट संघटना पुन्हा जागृत झाल्या असून झालेल्या कामांत पुन्हा खोडा घालण्याचे काम सुरु झाले असल्याचे मत नवी मुंबई आगरी कोळी युवक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष पुण्यनाथ तांडेल यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील बेलापूर गाव येथे विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण अर्धे अधिक झाले असून सदर सिटी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांना त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्डही मिळणार आहे. शासनाने सदरबाबत धोरण तयार केले असून ग्रामस्थांना ४ एफ.एस.आय. मिळण्यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. परंतु सदर कामाचे श्रेय आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना मिळू नये याकरिता काही संस्था, संघटना यांची केविलवाणी धडपड सुरु आहे. सर्व प्रथम त्यांनी सदर सिटी सर्वेक्षणास विरोध केला, ग्रामस्थांनी सर्वेक्षणास चांगला प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनी प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबतचा कांगावा सुरु केला. परंतु सिटी सर्वेक्षण झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड मिळणारच आहे, मग या संघटनांचा विरोध कशासाठी? असा प्रश्न मला पडला असून सदरचे काम हे अंतिम टप्प्यात असल्याने पुन्हा या संघटना सदरचे काम होऊ नये याकरिता कामांत खोडा घालण्याचे काम करीत आहेत. झालेल्या कामांचे श्रेय मला मिळू नये तसेच झालेले काम हे त्यांनी त्यांच्या संघटनांनी केले असे भासविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. सिटी सर्व्हे झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड मिळणार हे मी तर पहिल्या दिवसांपासून सांगत आहे. प्रॉपर्टी कार्ड तर मिळणारच आहे, हे त्यांनाही माहित होते, परंतु तरीही विरोधकांच्या सांगण्यावरून गावातील ग्रामस्थांना भडकविण्याचे काम अशा संघटनेने वारंवार करून तसेच कायद्यांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे ग्रामसभा घेऊन प्रक्षोभक भाषणे करून ग्रामस्थांना चिथावण्याचे काम त्यावेळी या संघटनांनी केले होते. गावातील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित व्हावीत, यासाठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. आज ग्रामस्थांकडे आपल्या घरांचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, सदर सिटी सर्वेक्षण होऊन ग्रामस्थांना त्यांच्या घरांना क्रमांकितही करण्यात आले आहे. गेल्या ४० वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न अनेक अडचणींचा सामना करून सोडविण्यात आला आहे. सदर सिटी सर्वेक्षण हे शासनामार्फत होत आहे. ग्रामस्थांची कोणतीही घरे मी तोडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. ज्या नतद्रष्ट संघटना झालेल्या कामांत खोडा घालत आहेत, त्यांचा यामागील काय हेतू आहे? हे मला माहित नाही.