Navimumbailive.com@gmail.com / ९८२००९६५७३
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : भाजपला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवरून खेचण्यासाठी व भाजपचे नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी महापालिका निवडणूकीपूर्वीच महाआघाडीत बिघाडी होण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. नेरूळ पश्चिममधील प्रभाग ९४ मधून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून महाआघाडीत प्रबळ दावेदारी केली जात असतानाच याच प्रभागावर स्थानिक भागातील कॉंग्रेसींनी प्रबळ दावा ठोकला आहे. महाआघाडीने कॉंग्रेसला ही जागा न सोडल्यास अपक्ष म्हणून लढण्याचा इशारा स्थानिक भागातील कॉंग्रेसीकडून उघडपणे दिला जावू लागला आहे. त्यामुळे महाआघाडीत बिघाडीचा नारळ नेरूळ पश्चिममधूनच फुटण्याचे स्पष्ट होवू लागले आहे.
कॉंग्रेसकडून प्रभाग ९४ मधून निवडणूक लढण्यासाठी नवनाथ चव्हाण प्रबळ दावेदार असून मागे त्यांनी एकदा महापालिकेची निवडणूकही लढविली होती. स्वच्छ प्रतिमा व दांडगा जनसंपर्क अशी नवनाथ चव्हाणांची ओळख आहे. एकीकडे शिवसेनेकडून दिलीप घोडेकर व राष्ट्रवादीतून राजेश भोर यांच्यात चुरस असून दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच मध्येच कॉंग्रेसीनी दावा व अपक्ष लढण्याचा इशारा दिल्याने भाजपसाठी आल्हाददायक वातावरणाचा शुभारंभ निर्माण झाल्याची राजकारणात चर्चा आहे.
सध्याचे अपक्ष नगरसेवक आपण निवडून आणले असून त्यांना आपणच मदत केली असल्याचे कॉंग्रेसच्या स्थानिक भागातील नेतेमंडळींकडून सांगण्यात येत आहे. भाजपकडून प्रदीप गवस यांचे तिकिट निश्चित मानले जात असले तरी नवी मुंबईच्या राजकारणात कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरज पाटलांची व या ठिकाणाहून तीन वेळा निवडून गेलेल्या रमेश शिंदेंची भाजपकडून चर्चा होत आहे. घोडेकर व भोर यांच्यात समजूत काढण्यासाठी महाआघाडी प्रयत्न करत असतानाच कॉंग्रेसच्या नवनाथ चव्हाणांसाठी कॉंग्रेसने प्रभागावर दावा ठोकल्याने महाआघाडीच्या छावणीत चिंतेचे निश्चितच सावट पसरलेले आहे. नेरूळच्या पश्चिमच्या काही भागात शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या गोपनीय बैठका होत असून परस्परात जागांची अदलाबदल करण्यासाठी चर्चाही होवू लागल्या आहेत. नवनाथ चव्हाणांसाठी कॉंग्रेसनी कंबर कसली असल्याने दिलीपभाऊ घोडेकर, राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश भोर व कॉंग्रेसचे नवनाथ चव्हाण यापैकी महाआघाडी कोणावर प्रसन्न होणार आणि कोण बंडखोरी करणार याकडे नेरूळ पश्चिमचे लक्ष लागून राहीले आहे.