वीस वर्षानंतर पुन्हा मित्रांच्या झाल्या भेटी
नवी मुंबई : कोपर खैरणेतील रा. फ. नाईक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन रविवारी संपन्न झाले. सण १९९८/९९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फे त्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास ६० हुन अधिक माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गप्पांची मैफिल रंगली.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आयुष्याच्या घोडदौडीत व्यस्त होतो. त्याकरिता बालपणाचे मित्र देखील विखुरले जातात. परंतु त्यांची नाळ शाळेशी कायम जोडलेलीच असते. यादरम्यान जसजसे वय वाढेल तसतसे त्यांनाही पुन्हा एकदा त्या बालमित्रांच्या सहवासात जाण्याची ओढ निर्माण होऊ लागते. त्यातूनच गेटटुगेदर, रियुनियन या संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागल्या आहेत. अशाच भावनेतून कोपर खैरणेतील रा. फ. नाईक विद्यालयातील १९९८/९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नोकरी व्यवसाय निमित्ताने देश विदेशात स्थायिक झालेल्यांसह सुमारे ६० हुन अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. तर १५ हुन अधिक शिक्षकांनी देखील या सोहळ्यास उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद लुटला. त्यात निवृत्त शिक्षकांचा देखील उत्साही सहभाग होता. कार्यक्रमास श्रमिक शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश नाईक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शाळेच्या माजी मुख्याध्यपिका लतिका दांडेकर, माजी उपमुख्याध्यापिका नीलांबरी साठे, मुख्याध्यापक सुधीर थळे, उपमुख्याद्यापक रामकिसन आंधळे, नीलिमा ठाकूर, ज्योत्स्ना क्षीरसागर, सरिता पाटील, नरेंद्र म्हात्रे, स्नेहा थळे, नसीम कुरणे, उल्हास मेहेतर, रवींद्र पष्टे, भास्कर अंभोरे यांच्यासह संतोष महाकाली व शंकर क्षीरसागर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी सूर्यकांत वाघमारे, संदीप पाटील, राकेश सावंत, अमोल जगताप, रुपेश म्हात्रे, शीतल राऊत, दीपाली सैद, शहाजी माळी, विशाल थोरात, रमजान मुजावर, रुपेश फुलसुंदर, महेश जाधव, सोमनाथ लोखंडे, किरण बेलोसे, प्रकाश जाधव, हेमंत धुमाळ यांच्या विशेष प्रयत्नातून हे स्नेह संमेलन झाले. यावेळी विद्यार्थिनी व शिक्षिका यांच्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत शिक्षिकांमधून स्नेहा थळे यांनी तर विद्यार्थिनींमधून साधना नलावडे-मोरे हिने पैठणी जिंकली. मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी सुरेश नाईक यांनी शाळेच्या उद्दिष्टांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तर उपस्थित शिक्षकांनी २० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.