स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३
नवी मुंबई : सारसोळे गावचा बामणदेव. सारसोळे ग्रामस्थांचे श्रध्दास्थान. खाडीमध्ये मासेमारी करावयास गेल्यास नैसर्गिक संकटापासून बामणदेवच आपले रक्षण करतो, अशी या सारसोळेच्या ग्रामस्थांची धारणा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सारसोळे ग्रामस्थांकडून गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीच्या दिनी २१ फेब्रुवारी रोजी बामणदेव भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बामणदेव म्हणजेच शिवशंकराचा अवतार. गेल्या अनेक वर्षापासून सारसोळे गावचे ग्रामस्थ गावातील युवकांनी स्थापन केलेल्या कोलवाणी माता मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीच्या दिनी बामणदेवाच्या भंडाऱ्याचे आयोजन करत आहे. या भंडाऱ्याची सारसोळेच्या ग्रामस्थांना एक महिना अगोदरच तयारी करावी लागते. बामणदेवाकडे जाणारा मार्ग आजही कच्चा व खाचखळग्याचा असल्याने या मार्गाची सफाई व स्वच्छता ग्रामस्थांना करावी लागते. वन विभाग, महापालिका व सारसोळेचे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हे सफाई अभियान साजरे होते.
बामणदेव भंडाऱ्यात दरवर्षी भाविकांचे सहभागी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दहा हजाराहून अधिक भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी बामणदेवाच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाभंडाऱ्याचेही आयोजन सारसोळेच्या ग्रामस्थांकडून करण्यात येते. नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून, पनवेल, ठाणे, उरण भागातूनही भाविकांचा ओघ बामणदेवाच्या दर्शनासाठी वाढू लागला आहे. नेरूळ नोडमधील भाविकही दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. आमदार, महापौर, सर्वपक्षीय नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रातील रथी-महारथीही या भंडाऱ्यात मनोभावे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही बामणदेवाच्या भंडाऱ्यात भाविकांनी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने सहभागी व्हावे असे आवाहन सारसोळेचे ग्रामस्थ व गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी केले आहे.