स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com-९८२००९६५७३
मुंबई : जरी सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले तरी रद्द करण्याविषयी सरकारने काही ठोस निर्णय घेतला नाही. महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने अधिकृत घोषणा तातडीने करतानाच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये या पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सध्याच्या सरकारने तातडीने केली पाहिजे.
या मागण्यासंबंधी 1 मार्च अगोदर सरकारकडून कार्यवाही न झाल्यास विधानसभेवर या विरोधात धडक मोर्चा नेण्याचा ठराव अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत झाला.
या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सह सचिव आणि भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि महाराष्ट्राचे प्रभारी हरपाल सिंह यांची विशेष उपस्थिती होती.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव तसेच युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी यावेळी उपस्थितांना सी ए ए आणि एन आर सी आणि भाजपच्या आरक्षणविरोधी धोरणाचा समाचार घेतला.युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून सरकारचे काम त्याच्यापर्यंत पोहोचवावे असे सांगितले
महिलांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये बरोबरीचे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी संघटनापातळीवर ठोस निर्णय घेतले जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
हरपाल सिंह यांनी युवक काँग्रेसचे काम महाराष्ट्रात चांगले चालल्याचे नमूद करून नाशिक, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांचा विशेष उल्लेख केला.
दरम्यान, प्रदेश युवक कॉंग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेले युवा जोडो अभियान ( सुपर १०००) आणि राष्ट्रीय बेरोजगारी रजिस्टर तथा NRU ची मोहीमेची व्याप्ती वाढवण्यासाठी विविध ठराव पारित करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेससाठी तडफदार प्रवक्ते शोधण्यासाठीच्या ‘यंग इंडिया के बोल’ ह्या वक्तृत्वस्पर्धेच्या प्रसिद्धीपत्रकाचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.