स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com-९८२००९६५७३
नवी मुंबई : मतदानाच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहिर होवून दोन महिन्यात नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात प्रचाराचा धुराळा उडणार आहे. एकीकडे भाजप पक्ष व दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांची महाविकास आघाडी अशी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी अटीतटीची लढत होणार आहे. महापालिका स्थापनेपासून महापालिकेवर असलेली गणेश नाईकांची सत्ता खेचून काढण्यासाठी महाआघाडीकडून जय्यत तयारी सुरू झालेली आहे. त्यातच भाजप पदाधिकारी व नगरसेवकांचे पक्षातून ‘आऊंटगोईंग’ सुरू झाल्याने निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्यापूर्वीच एकीकडे भाजपच्या गडाला खिंडार तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गडाला बळकटी असे चित्र निर्माण होवू लागल्याचे पहावयास मिळत आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात प्रथम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्रितपणे लढत आहे. गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिका पातळीवर नवी मुंबईकरांनी गणेश नाईकांचे नेतृत्व मान्य करत सत्तेचे सुकानू त्यांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे येवू घातलेली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गणेश नाईकांसाठी पर्यायाने भाजपसाठी व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची होवून बसली आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच भाजपच्या छावणीत खळबळ उडाली असून नाईकांच्या गडाला तडे जाण्यास सुरूवात झाली आहे. नाईक समर्थक म्हणून आजवर समाजात उघडपणे मिरवणारी नगरसेवक व अन्य राजकीय मंडळी शिवसेना व राष्ट्रवादीच्या छावणीत जाण्याच्या हालचाली करू लागली आहेत. सर्वप्रथम तूर्भेच्या गडाला खिंडार पडले असून त्यापाठोपाठ अनेक नगरसेवकांनीही भाजपला ‘जय महाराष्ट्र’ करण्याची तयारी केली असून ते कोणत्याही क्षणी शिवसेना व राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे.
१११ नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या महापालिका सभागृहात ‘अब की पार, ८० पार’ हा दावा भाजपकडून केला जात असला तरी त्या दाव्यात फारसा दम नसल्याचे भाजपची मंडळी सांगू लागली आहेत. पूर्वीच्या भाजपमधील मंडळी कार्यरत असली तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत दोन-चार मंडळी सोडली तर इतरांच्या विजयावर तर सोडा, पण ५००-१००० मतांच्या क्षमतेवरही खुद्द भाजपच्या जुन्या मंडळींकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गणेश नाईकांसोबत आलेली मंडळी पुन्हा एकवार शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी घरोब्याची चाचपणी करू लागल्याने निवडणूकांमध्ये यश कितपत मिळेल व किती नगरसेवक निवडून येतील यावरच आता भाजपमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावू लागले आहे.
दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी एकत्रितपणे कामाला लागली आहे. सत्ता मिळवायचीच या जिद्दीने महाविकास आघाडी इरेला पेटलेली दिसून येत आहे. मतदारसंघ, उमेदवार व पक्ष नाही तर महाविकास आघाडीची सत्ता महत्वाची हाच अजेंडा राबविण्यासाठी शशिकांत शिंदे, विजय नाहटा, अनिल कौशिक, अशोक गावडे, विठ्ठल मोरे, संतोष शेट्टी आदी मंडळी आपापल्या पक्षातील सहकाऱ्यांसह मोर्चेबांधणीत व्यस्त झाली आहे. रवींद्र सावंत यांच्या प्रभागावरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे असून भाजपदेखील याकडे बारीक लक्ष ठेवून आहे. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक रंगनाथ आवटी ओबीसी प्रभागातून पत्नीला निवडणूकीत उभे करण्याच्या तयारीत असल्याने ही जागा महाविकास आघाडीत रवींद्र सावंत यांना शिवसेनेला सोडावी लागणार आहे. सानपाडा येथील दिलीप बोऱ्हाडे यांचा प्रभाग वगळता सानपाडा, जुईनगर, नेरूळ पश्चिममध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीला जागाच नसल्याने रवींद्र सावंत यांच्यासाठी, महाआघाडीच्या भवितव्यासाठी शिवसेनेला रंगनाथ आवटींच्या जागेचे बलीदान करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपमधून येणाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे तिकिट बरे पडेल अशी भाषा नगरसेवकांकडून व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जावू लागल्याने भाजपसाठी ती धोक्याची घंटा मानली जावू लागली आहे.