महेश जाधव :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :- कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचा नवी मुंबई महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता सर्वत्र बोलबाला असला तरी भाजपच्या तिकिटसाठी नवी मुंबईतील रथी-महारथींचा भाजपकडेच ओढा असल्याचे अजूनही पहावयास मिळत आहे. पालिका निवडणूक लढविण्यासाठी मोठ्या संख्येने इच्छूक ठाणे-बेलापुर मार्गावरील आमदार गणेश नाईकांच्या क्रिस्टल कार्यालयाकडे व बेलापुर येथील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या ‘गौरव’ बंगल्याकडे धावपळ करताना पहावयास मिळत आहे.
महापालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक भाजप व महाविकास आघाडी दोघांसाठीही प्रतिष्ठेची बनली आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार बनल्यावर होत असलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणूक निकालानंतर महाआघाडीने भाजपचे पानिपत केले अथवा भाजपने महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केले हे निवडणूक निकालानंतरच पहावयास मिळणार आहे. नाईक समर्थकांकडून आजही महापालिका निवडणूकीत नाईकांनाच सर्वाधिकार असल्याचे सांगत असले तरी भाजप पक्षातील जुनेजाणते हे बेलापुरच्या आमदार मंदाताईंना विश्वासात घेतल्याशिवाय भाजपचे वरिष्ठ तिकिट निश्चित करणार नसल्याचे सांगत आहेत.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या काही घटकांनी आजही जनसंपर्क कार्यालयावर भाजपचे बॅनर तसेच कमळ निवडणूक चिन्ह लावलेले नाही. त्यातच बेलापुर विधानसभा मतदारसंघात बॅनर लावताना आमदार मंदाताईंचा फोटो लहान व ऐरोलीचे आमदार गणेश नाईकांचा फोटो मोठा टाकला जात आहे. नाईकसमर्थक असलेले काही महाभाग आजही जाणिवपूर्वक बॅनरवर मंदाताईचा फोटो लावणे टाळत असून त्यांना कार्यक्रमालाही बोलवत नाही. आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंचे समर्थक सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
महाविकास आघाडीत १११ पालिका मतदारसंघापैकी किमान ६५ ते ७० जागा शिवसेना लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यापाठोपाठ उरलेल्या जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला लढविण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. कॉंग्रेस मोजक्या जागा लढवित असली तरी हमखास विजयी होणाऱ्या जागांवरच कॉंग्रेसकडून दावा केला जात आहे. कॉंग्रेस नेरूळ ब्लॉक अध्यक्ष व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. रवींद्र सावंत यांनी कालच कॉंग्रेसचे मातब्बर नेते व राज्याचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते नेरूळ ब्लॉकच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करताना नेरूळ सेक्टर २-४ प्रभागातूनच कॉंग्रेस निवडणूक लढणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीला दिला आहे.
नेरूळ पश्चिममध्ये भाजपमधील अनेक घटकांनी बंडखोरीची तयारी केली असून या बंडखोरांच्या हालचालीवर महाविकास आघाडी लक्ष ठेवून आहे. गणेश नाईक समर्थक एका ४० वर्षीय युवा नेतृत्वाला अडकवण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू असून या नेतृत्वाच्या मागील सर्व घडामोडींची फाईल प्रभाग ८५,८६, ८७, ९३, ९५ मध्ये ठराविक राजकारण्यांकडे पाठविण्यात आली असून निवडणूक काळातच अडचणीत आणण्याची रणनीती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेरूळ पश्चिमवर महाआघाडीने विशेष लक्ष केंद्रीत केले असून महाआघाडीतील अजून कोणी भाजपच्या व भाजप नेत्यांच्या संपर्कात आहे का याचीही महाआघाडीकडून माहिती घेण्यात येत आहे. भाजप नेत्यांशी जवळीक असणाऱ्या कोणत्याही घटकाला पालिका निवडणूकीत तिकिट दिले जाणार नसल्याचे महाआघाडीतील सूत्रांनी सांगितले.
क्रिस्टल व बेलापुरच्या गौरव बंगल्यावर पालिका निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांची त्यांच्या बायोडाटासह केलेली गर्दी पाहता महाविकास आघाडीला पालिका निवडणूक पाहिजे तितकी सोपी जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे तिकिट न मिळाल्यास शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींशी अनेक जण संपर्क ठेवून असल्याने ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपा तसेच महाविकास आघाडीतही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. दिघा, तुर्भेतील भाजपच्या मातब्बरांनी धनुष्याशी जवळीक साधल्याने आणि सिवूडसह इतर भागातील नाईक समर्थकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधल्याने नाईक समर्थकांच्या नाईक प्रेमाला ओहोटी लागल्याचे नवी मुंबईच्या राजकारणात मानले जात आहे. त्यातच जुईनगर नोडमधील एक नाईक समर्थक परिवार आता कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधण्याच्या तयारीत असल्याने भाजप प्रदेश पातळीवरील नेते नवी मुंबईतील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यातच नाईकांनी शिवसेना सोडताना व त्यानंतर राष्ट्रवादी सोडताना सर्व समर्थकांना घेवून अलविदा केल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीही खीळखिळी झाली होती. त्याही घडामोडीकडे भाजप लक्ष ठेवून आहे. नाईक समर्थकांना तिकिट देताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना तिकिट वाटपात डावलले जाणार नाही याकडे भाजपप्रदेश घडामोडीवर नजर ठेवून आहे.