अनंतकुुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com / 9820096573
नवी मुंबई : जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्याकडून सानपाडा येथे ‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सानपाडा येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, बधाई स्वीट समोर, सेक्टर – ३ येथे सायंकाळी ७ वाजता ते रात्री ९ वाजेपर्यंत ही मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
२७ फेब्रुवारी हा कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव २०१४ पासून केंद्र सरकारकडे खितपत पडला आहे. केंद्र सरकारने तातडीने त्याबाबत निर्णय घ्यावा यासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्याकडून ‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मराठी स्वाक्षऱ्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
साहित्य अकादमीने मान्यता देऊनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही. ऑगस्ट २०१६ मध्ये मराठी साहित्य महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले; मात्र त्याची पूर्तता झालेली नाही.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, तसेच अन्य मागण्यांसाठी २४ साहित्य संस्थांनी एका व्यासपीठाची स्थापना केली. या व्यासपीठाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. दरम्यान, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल असल्याचे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी यांनी त्यावेळी सांगितले.
पण हा दर्जा मिळण्यास किती कालावधी लागेल, याबाबत साशंकता असल्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मनसे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्याकडून ‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे.