मुंबई : कर्नाळा नागरी सहकारी बँकेत घोटाळा करणारे शेकापनेते व माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची चौकशी करण्याचे आश्वासन राज्याचे धर्मादाय आयुक्त आर. एन. जोशी यांनी दिले आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत शेकाप नेते व माजी आमदार विवेक पाटील व संचालक मंडळाने ६३ व्यक्तींच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे करून ५१२.५४ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झालेले आहे. या संदर्भात जिल्हा विशेष लेखापरिक्षक,सहकारी संस्था अलिबाग रायगड यानी आपला चौकशी अहवाल सहकार खात्यास सादर केलेला असून त्या अनुषंगाने बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, संचालक मंडळ, अधिकारी वर्ग व बेनामी कर्जदार अशा एकूण ७६ जणांवर भादवि कलम ४0९,४१७, ४२0, ४६३,४६५,४६७,४६८,४७१,४७७,२0१,१२0 (ब),३४, सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १४७, सहकारी महाराष्ट्र ठेविदार हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम१९९ चे कलम ३ अन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत.
जिल्हा विशेष लेखापरिक्षक,सहकारी संस्था अलिबाग-रायगड यांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट म्हटले आहे की, ज्या ६३ व्यक्तीच्या नावे बोगस कर्ज दाखवलेले आहे, त्या कर्ज खात्यातील बऱ्याच रक्कमा हया कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थांकडे वर्ग झाल्याचे नमुद केलेले आहे. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी या संस्था महाराष्ट्र विश्वस्त अधिनियम १९५0 अन्वये नोंदलेल्या असल्याने व कर्नाळा बँकेत झालेल्या अपहरापैकी बऱयाच रक्कमा या दोन्ही संस्थेकडे वर्ग झाल्याने सदरच्या संस्थातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्कम उचलून त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केलेला असावा. त्यामुळे या दोन्ही संस्थांची महाराष्ट्र विश्वस्त अधिनियम १९५० कलम ३७ नुसार लेखापरिक्षण करून कलम ३३(४) अन्वये चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते किरिट सोमैय्या, आमदार प्रशांत ठाकूर, कुंडलिक काटकर यांनी महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर कर्नाळा चॅरिटेबल व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची धर्मादाय आयुक्त कार्यालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले असून काही अनागोंदी अढळून आल्यास संबंधित दोषींवर कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.