नवी मुंबई : नेरूळ येथील एनआरबी एज्युकेशनल, सोशल आणि कल्चरल ट्रस्ट संचालित शिक्षण प्रसारक विद्यालय (प्राथ. व माध्य.), एन आर भगत इंग्लिश स्कूल, एन आर भगत जूनियर व सीनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री नामदेव रामा भगत व श्री मोहन लाल तेली यांच्या शुभहस्ते विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर इंग्रजी विभागाच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीताचे गायन केले. एन आर भगत कॉलेज ची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा कुलकर्णी हिने कुसुमाग्रज यांच्या या साहित्यिक योगदान यावरील माहितीपूर्ण भाषण केले.
कॉलेजच्याच हर्षला बांदल याविद्यार्थिनीने सावित्रीबाई च्या वेशात सावित्रीबाईंचे मनोगत सुंदर दित्या व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली तर प्रांजली म्हात्रे या विद्यार्थिनीने चित्रपट सृष्टीत दादासाहेब फाळके यांच्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला, चंद्रभागा आडांगळे या विद्यार्थिनी ने आजच्या युगातील स्त्रीच्या समस्या भावपूर्ण रीतीने व्यक्त केल्यात तर प्रज्ञा गायकवाड या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांवरील पोवाडा खड्या आवाजात सादर करून वातावरण भारावून टाकले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी संस्कृतीची ओळख सादर करताना इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी मंगळागौर हे स्त्रियांचे समूह नृत्य सुंदररित्या सादर केले तर माध्यमिक विभागाच्या प्रतीक्षा गरजे या विद्यार्थिनीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त निमित्त साहित्यिकांचे मराठी भाषेच्या विकासातील योगदान या विषयावर आपले मत व्यक्त केले इंग्रजी माध्यमाच्या मुस्कान या मुलीने मराठी भाषेचे महत्व आपल्या भाषणात समजावून सांगितले. त्यानंतर एन आर भगत कॉलेजच्या सिद्धेश सावंत, आकाश शिंदे, मयूर हिरवे, रोहित कांबळे,आतिश, राजश्री सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी आजच्या काळातील शिवाजी महाराजांच्या नावाखाली गुंडगिरी करू पाहणाऱ्या मुलांना शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा धडा देणारी एक सुंदर नाटिका सादर केली. यानंतर आकाश थापा, दीपिका चौधरी, संदेश कदम, निधी पोळसलकर आणि श्रुतिका या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी धनगर नृत्य सादर केले तर अभिषेक परब आणि सुजल चव्हाण या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक विनोदी एकांकिका सादर करून उपस्थितांची करमणूक केली.यानंतर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ प्रतीक्षा बारटक्के यांनी “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नामदेव रामा भगत यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना मराठी भाषेचे महत्व त्यानंतर मराठी भाषेचे घटक असणाऱ्या अनेक बोलीभाषा यांची ओळख करून दिली आणि मराठी साहित्यातील साहित्यप्रकार खासकरून संत साहित्य यांचा मराठी माणसाच्या जीवनावरील प्रभाव याविषयी मार्गदर्शन केले. मराठी बोलणारा माणूस आज जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे कोणी शिक्षणाच्या निमित्ताने, कोणी व्यवसायाच्या निमित्ताने तर कोणी नोकरीच्या निमित्ताने उच्चशिक्षित होऊन इंग्रजी-हिंदी सारख्या इतर भाषा अवगत करून ग्लोबल होऊन मराठी माणूस आज आपल्या आईला मातृभाषेला विसरत चालला आहे ही खंत त्यांनी व्यक्त केली. आज मराठी भाषा गौरव दिनापासून प्रत्येकाने अन्य व्यक्तीशी संवाद साधताना आपल्या मुखातून पहिला शब्द मराठीच काढावा हा संकल्प प्रत्येकाने करावा असे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.
यावेळी मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कोठेकर, वंदना पाटील,कॉलेजचे प्राचार्य सुमित भट्टाचार्य, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका भुवनेश्वरी मॅडम तसेच प्रशासक श्री ब्रह्मण सर श्री नजिम सर संस्थेचे खजिनदार श्री अशोक पाटील साहेब हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन आर भगत कॉलेजच्या शितल छायल, प्रज्ञा, सुरेखा सरंबळे, शिक्षण प्रसारक विद्यालयाच्या प्रदीप खि स्ते, राजेंद्र पिंगळे,बाळासाहेब नाईकनवरे,शेखर जगताप, भाऊसाहेब आव्हाड, पूर्वा ठाकरे प्राथमिक विभागाच्या सुनंदा नौकुडकर, सुनिता वीर, सुगंधा घुले, वृषाली परदेशी, सुनील परदेशी, काळुराम जाधव, निराशा मोकल इंग्रजी माध्यमाच्या सुनिता रेड्डी, आसमा, भाग्यश्री त्याचप्रमाणे मनीषा गावंड, विद्या पाटील, स्वाती मोकल, सरस्वती पाटील यांनी मेहनत घेतली.