मुंबई : आपल्या महाराष्ट्रात अनेक अंधश्रध्दामुळे अनेक हत्या झाल्या. मध्यंतरी पाऊस पाडतो म्हणून हत्या झाली. निंदनीय घटना घडत आहे. मध्यंतरी समस्या सोडविण्याच्या नावाखाली कोणा महाराजाने अनेक महिलांचे शोषण केले. अशा महाराजांना, तसेच वासंनाध प्रवृत्तींना भर चौकात मारले पाहिजे. महाराष्ट्रात पोलिसांची दहशत उरलेली नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यात महिलांना जाळले जात आहे. हे प्रकार भरवस्तीत घडत आहे. महिलांवरील अत्याचार दिवसेंगणिक वाढत आहेत. पोलिसांनी अशा घटनांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, असे प्रतिपादन बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी विधानभवन परिसरात प्रसिध्दी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.
बेलापुरच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे या गेली तीन दशके सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरत असून एक खमक्या व्यक्तिमत्वाच्या वाघिणीसारखी आक्रमक राजकारणी, रणरागिनी अशी त्यांची प्रतिमा आहे. चुकीला माफी नाही या आवेशात त्या राजकारणात व समाजकारणात घडणाऱ्या चुकांबाबत जागेवरच प्रतिक्रिया देवून आपली आक्रमकता दाखवित संताप व्यक्त करत असतात.
समाज दोन्ही बाजूने बोलणारा असतो. पोलिसांनी कठोर कारवाई करायला सुरूवात केली की पोलिसांवरही शंका उपस्थित केली जाते. पोलीस असे का वागले, त्यांनी असे वागायला नको होते, असे सांगत पोलिसांच्या कार्यक्षमतेचे खच्चीकरण करण्याचा तो प्रकार होतो. महिलांवर, मुलींवर अन्याय होत आहे. शोषण होत आहे. त्यांना नको त्या प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नक्कीच नाही. समाजाने महिलांवर अत्याचार होत असेल तर बघ्याची भूमिका घेण्याचे प्रकार आता कोठेतरी थांबले पाहिजेत. अशा नराधमांना भर चौकात समाजाकडून फटके पडण्याचे प्रमाण वाढीस लागले तर अशा वासनांध, कामांध अपप्रवृत्ती जागेवरच ठेचल्या जातील. प्रत्येकाच्या घरात महिला असतात. आई, बहीण, मुलगी व इतर नात्यात महिला वावरत असते. आपण समाजातील सर्वच महिलांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी समजल्यास महिला अत्याचाराना पायबंद बसेल, पण त्यासाठी महिला अत्याचाराविरोधात प्रत्येकाच्या मनात संताप निर्माण झाला पाहिजे, अशा नराधमांना धडा शिकविण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले तरच या महाराष्ट्रात कोठेही वावरताना महिला वर्गामध्ये एक सुरक्षिततेचे वातावरण नजीकच्या भविष्यात निर्माण होईल, असा आशावाद आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.