अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कंत्राटी व ठोक मानधनावरील कामगारांची सेवा कायम करून त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
वाढत्या महागाईच्या काळात तारेवरची कसरत करणाऱ्या कामगारांच्या वेतनात झालेली वाढ ही खरोखरीच सुखावह बाब आहे. तथापि कायम कामगारांव्यतिरिक्त पालिका प्रशासनात कंत्राटी कामगार व ठोक मानधनावरील कामगार काम करत आहेत याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. नवी मुंबईत नेहमीच साथीचे आजार येतात. सध्या कोरोनाचा आजार देशात, राज्यात व इतरत्र फैलावत आहे. राज्य सरकारने शासकीय आस्थापनेत ५० टक्केचा फार्म्यूला लागू केला असताना तसेच खासगी आस्थापणांशी चर्चा करून तेथेही बंद करण्याबाबत विचारविनिमय केलेला आहे. कोरोना व्हायरस या आजारामुळे सर्व विभागांना सुट्टी जरी जाहीर केली असली तरी आरोग्य विभागाचे कर्मचारी आपला जीव मुठीत घालून आजही काम करत आहेत. सफाई कामगार, मूषक नियत्रंण विभाग कर्मचारी आजही आपले कामगार प्रामाणिकपणे काम करत आहेत. नवी मुंबई महापालिकेत करार पद्धतीने तसेच ठोक मानधनावर एएनएम काम करीत आहेत. आस्थापनेवर काम करत असलेल्या एएनएमला सातवा वेतन आयोग लागू झाला असून ठोक मानधनावर काम करणाऱ्या एएनएम मात्र तुंटपुंज्या मानधनावर त्यांच्या आरोग्याला धोका असतानाही काम करत आहेत. काम करताना त्यांच्यामध्ये देखील उत्साह निर्मांण व्हावा यासाठी कंत्राटी व ठोक मानधनावर काम करणाऱ्या एएनएमला, शिपाई, लिपिक,अभियंता, तसेच सर्व वर्गातील उर्वरित सर्व कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करून घ्यावे तसेच त्यांना अन्य कायम कामगारांच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग कंत्राटी व ठोक मानधनावरील कामगारांनाही लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या दालनात त्यांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी बैठकही झाली होती. त्यांनी पालिका प्रशासनाला याबाबत निर्देशही दिले होते. कामगार हितासाठी आपणाकडून शक्य तितक्या लवकर कार्यवाही अपेक्षित असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.