अॅड . महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना विषाणूचा (कोव्हीड – १९) प्रादुर्भाव संसर्गातून पसरत असल्याने त्यावर प्रतिबंध आणण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये असे देशव्यापी आवाहन केले आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. या अनुषंगाने खबरदारीची उपायोजना म्हणून नागरिकांची गर्दी होईल अशी कोणतीही कृती होऊ नये यादृष्टीने आवश्यक ते निर्बंध राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक पातळीवर घालण्यात आले आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुढील काही आठवडे जोखमीचे आहेत हे लक्षात घेऊन संयम आणि संकल्प याची कास धरत कोरोनावर मात करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी १९ मार्च रोजी देशाला संबोधि्त करताना रविवार, दि. २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत भारतीय नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने ‘जनता संचारबंदी’ पाळावी असे आवाहन केले आहे. या काळात प्रत्येकाने आपल्या घरातच थांबावे व अगदी अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे सूचित करण्यात आले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय सेवा पुरविणारे डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक, आपत्कालीन सेवेतील कर्मचारी, सुरक्षेसाठी तैनात पोलीस व इतर सरकारी कर्मचारी, विविध प्रकारच्या सेवा देणारे लोक हे सर्वजण स्वत:ची पर्वा न करता जनसेवा करीत आहेत. या व्यक्ती, संस्थांच्या राष्ट्ररक्षक कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी 5 वा. नागरिकांनी आपल्या घराच्या खिडकीत, बाल्कनीत, दरवाजात उभे राहून टाळी, घंटी अथवा थाळी वाजवून त्यांचे आभार मानवेत असेही आवाहन मा. पंतप्रधान महोदयांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या देशव्यापी आवाहनास अनुसरून नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोना विषाणूविरूध्दच्या लढ्यात सामाजिक कर्तव्य भावनेने रविवार, दि. २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत स्वत:हून घरात थांबून ‘जनता संचारबंदी’ व्दारे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.