सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २६ हजाराहून अधिक दंड वसूली
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळण्याकडे भर देत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी राज्यात लागू करण्यात आलेल्या ‘साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७’ चे सक्षम प्राधिकारी म्हणून शाळा, महाविद्यालय, क्लासेस, सिनेमागृहे, नाट्यगृहे, उद्याने, पार्क, सभागृहे, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, व्यायामशाळा अशा विविध ठिकाणी प्रवेश प्रतिबंधीत केला असून रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि ज्युस विक्रीवर पूर्णत: बंदी आणली आहे.
याच अनुषंगाने तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थ यांची विक्री करणारी सर्व दुकाने व पान टपऱ्या बंद करण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूव्दारे होणारा आजार हा संसर्गजन्य व श्वसनसंस्थेशी निगडीत असल्याने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २५० रुपये इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येत असून नागरिकांनी आपल्या वर्तनात सामाजिक आरोग्य हिताच्या दृष्टीने बदल घडवावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पूर्णत: बंद करून स्वत:चे व इतरांचे आरोग्य जपावे याकरिता थुंकण्यावरील प्रतिबंधाकडे काटेकोर लक्ष दिले जात आहे.
याकरिता विभाग कार्यालय स्तरावर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कार्यरत असणारे स्वच्छता अधिकारी व निरिक्षक या बाबीकडे विशेष लक्ष देत असून मागील ३ दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १०५ नागरिकांकडून २६ हजार २५० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूकतेने राहणे गरजेचे असून कुठेही थुंकण्याची सवय नेहमीसाठी पूर्णत: बंद करायला हवी. विशेषत्वाने सध्याच्या कोरोना प्रसाराच्या अनुषंगाने याबाबत अतिशय जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर केला जाणारा दंड भरण्याची वेळच येऊ नये अशा प्रकारे आपले वर्तन नागरिकांनी ठेवावे व स्वत: प्रमाणेच सामाजिक आरोग्याचीही काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.