पनवेल संघर्ष समितीची मागणी
पनवेल: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश कारखान्यांना कुलूप लावण्यात आलेले आहे. गर्दी टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे तिथे पाण्याचा वापरही होत नसल्याने ते पिण्याचे पाणी एमआयडीसीने पनवेल महापालिका आणि सिडकोकडे वळते करावे, अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पत्राद्वारे अधीक्षक अभियंता मारुती करकुट्टी आणि पी. के. भारती यांच्याकडे केली आहे.
घरातून बाहेर पाडण्यास राज्य शासनाने नागरिकांवर सक्तीची बंदी घातली आहे. संचारबंदी मुळे लोकं घरीच थांबले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच वारंवार हात धुण्याची सवय जडल्याने पाणी पुरवठा सुरळीत नव्हे तर मुबलक प्रमाणात व्हावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पाणी टंचाईचे भूतही पिच्छा सोडायला तयार नाही.
या धर्तीवर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आज सकाळी एमआयडीसीचे तूर्भे येथील अधीक्षक अभियंता मारुती करकुट्टी, अंबरनाथ येथील अधीक्षक अभियंता पी. के. भारती यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना बंद औद्योगिक वसाहतीचे पाणी तूर्तास महापालिका आणि सिडकोकडे वळते करण्याची विनंती केली आहे, शिवाय लेखी पत्रही तातडीने पाठविले आहे.
एकीकडे कोरोनाची साथ, दुसरीकडे कडक उन्हाळा आणि घरात थांबलेल्या लोकांची बदलती मानसिकता यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा अंदाज घेता तळोजातील बंद कारखान्यांच्या नेहमी वापरातील पाणी नागरी वसाहतींना वळते करणे सार्वजनिक हिताचे ठरेल, असा युक्तिवाद करून मागणी त्वरित मान्य करून प्रत्यक्षात पाणी वळते करण्याची विनंती त्यांना केली आहे.
कारखाने पुन्हा सुरू होईपर्यंत ते पाणी पनवेल महापालिका आणि सिडकोकडे वळते करावे. कारखाने सुरू झल्यावर पाणी त्यांना मिळण्यासाठी पूर्ववत करावे, असेही सुचविण्यात आले आहे.