सफाई कामगारांना मास्क, हॅन्डग्लोव्हज, सॅनिटायझरचे वितरण आणि त्यांचा वापर करण्याचे निर्देश
अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून आरोग्याचा स्वच्छतेशी असलेला निकटचा संबंध लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई सारख्या आवश्यक बाबीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने रात्री रेल्वे स्टेशन परिसर, डेपो परिसर, मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असणारी ठिकाणे यांचे अत्याधुनिक जेटींग मशीनव्दारे सोडियम हायपोक्लोराईड सारखे जंतुनाशक फवारून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील ९२ साफसफाई कंत्राटदारांमार्फत सर्व सफाई कामगारांना मास्क आणि हॅन्डग्लोव्हज सारख्या सुरक्षा साधनांचे वितरण करण्यात आले असून त्याचा न चुकता वापर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सर्व ९२ साफसफाई कंत्राटदारांकडे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक गटाला ५ लिटर सॅनिटायझरचे कॅन्स वाटप करण्यात आले आहे.
याशिवाय मुख्यालयासह महानगरपालिकेच्या प्रत्येक कार्यालयात एक आठवडा आधीपासून हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा वापर केला जात आहे.
त्याचप्रमाणे कोरोना विषाणू हा जमिनीवर टिकून राहतो हे लक्षात घेऊन सुरक्षेची उपाययोजना म्हणून महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांच्या प्रवेशव्दाराजवळ जंतुरोधक औषधाचे मिश्रण असलेले पाण्याचे टब ठेवण्यात आले असून कार्यालयात प्रवेश करतेवेळी प्रत्येकाने पादत्राणांसह आपले पाय त्या मिश्रणात बुडवून, पाय पुसणीव्दारे स्वच्छ करून कार्यालयात प्रवेश करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे व त्याचे पालन केले जात आहे.
कोरोना विरोधातील लढाईसाठी महानगरपालिका आवश्यक ती सर्व काळजी घेत असून नागरिकांनी आपल्या घरातच थांबून संसर्गाव्दारे पसरणाऱ्या या आजाराची साखळी खंडीत करण्यात आपले योगदान द्यावे आणि आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याचे रक्षण करावे असे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने पुन्हा पुन्हा करण्यात येत आहे.