अॅड . महेश जाधव
नागपूर : करोनामुळे
धास्तावलेल्या विदर्भवासीयांपुढे आता पुढील काही दिवस वादळी पावसाचेही आव्हान आहे.
बुधवारी मध्यरात्री दरम्यान विदर्भात नागपूरसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने
हजेरी लावली. काही ठिकाणी तर गारपीटसुद्धा झाली आहे. यामुळे पीकांचेही नुकसान झाले
आहे.
सोमवारपर्यंत विदर्भात ही परिस्थिती कायम राहणार आहे.
त्यामुळे विदर्भवासीयांनी पुढील काही दिवस आपल्या प्रकृतीची अधिक काळजी आवश्यक आहे.
करोना व्हायरसचा परिणाम थेट श्वसनयंत्रणेवर होते. सामान्य व्हायरल आजार झाल्यासही हीच
लक्षणे असतात. वातावरणात अचानक बदल झाल्यास आणि वादळी पाऊस पडल्यास साथीचे आजार फैलावण्याची
शक्यता असते. सोमवारपर्यंत पावसाळी वातावरणापासून सुटका नसल्याने नागरिकांनी अधिक काळजी
घेणे आवश्यक आहे.
बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ओडिशा तसेच मध्य भारतातील हवेत आर्द्रता निर्माण झाली आहे. याचा परिणाम हा वादळी पावसात होत आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारस शहरात वादळी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शहरात सर्वदूर पडल्याचे समजते. याखेरीज विदर्भातही चांगलाच पाऊस झाला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली वगळता सर्वच ठिकाणी वादळी पाऊस झाला आहे. विदर्भात वाशिम येथे सर्वाधिक २७ मीमी पावसाची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल अमरावती येथे १७ तर नागपुरात १३.८ मीमी पावसाची नोंद झाली. यामुळे तापमानातही फरक पडला असून गेल्या २४ तासांत अमरावती येथील किमान तापमानात ३.८ ची तर नागपुरातील किमान तापमानात २.६ अंशांची घसरण झाली आहे. ही स्थिती सोमवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.