लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्तेही कोरोनाविरोधातील लढाईत आक्रमकपणे सहभागी
आश्विनी भोईर
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनासोबत लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, गृहनिर्माण सोसायट्यादेखील स्वच्छतेसाठी सतर्क झाल्या असून महापालिका प्रशासनाकडून मध्यरात्री शहरातील अंर्तगत व बाहेरील रस्ते जंतुनाशकांची फवारणी करून स्वच्छ करण्यात येत आहे.
सकाळी कचरा वाहतुकीच्या गाड्या कचरा संकलनाचे काम करत असून त्यात कोणताही खंड पडलेला नाही. दुसरीकडे सफाई कामगारांकडून नियमितपणे दिवसातून दोन वेळा रस्ते सफाईचे काम सुरूच आहे. मध्यरात्री नवी मुंबई सुमसाम झाल्यावर महापालिका प्रशासनाकडून शहरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर जंतुनाशकाची फवारणी केली जात आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या प्रभागात जंतुनाशकाची फवारणी होत असेल त्या त्या ठिकाणचे नगरसेवक, नगरसेविका त्या वाहनांसोबत फिरून प्रभाग स्वच्छता अभियनात सहभागी झाल्या आहेत.
याशिवाय लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून घरोघरी यापूर्वीच मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. काही ठिकाणी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते दुकानांसमोर पट्टे मारून ग्राहकांना आपल्यामध्ये अंतर ठेवण्याच्या सूचना करत आहेत. ज्या ठिकाणचे राजकीय पदाधिकारी व माजी नगरसेवक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी निघून गेले आहेत, त्यांना सोशल मिडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. अधिकांश गृहनिर्माण सोसायट्यांनी आपल्या रहीवाशांना मोजक्याच वेळेकरीता प्रवेशद्वार उघडे ठेवले असून त्यानंतर प्रवेशद्वार बंद केले जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या आतील भागात स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविली जात आहे. प्रभागात कोणी बाहेरून आलेला नाही ना, याची युध्दपातळीवर लोकप्रतिनिधींकडून व सामाजिक कार्यकर्त्यांकडून तपासणी केली जात आहे. सामाजिक संस्थांकडून ठिकठिकाणी पोलिसांना, महापालिका कर्मचाऱ्यांना, रस्त्यावरील बेघरांना अन्नाचे व पाण्याचे वाटप सुरू आहे.
एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोनाविरोधात जय्यत तयारी करत असतानाच दुसरीकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनही कोरोनाच्या विरोधात मैदानात उतरले आहे. राजकीय व सामाजिक घटकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सारसोळे गावातील समाजसेवक मनोज मेहेर गेल्या आठ दिवसापासून सकाळी शासकीय कार्यालयातील कर्मचारी, पोलीस यांना स्वखर्चाने नाष्टा उपलब्ध करत असून रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपणाऱ्यांना खाणे व पाण्याची सोयही मनोज मेहेर उपलब्ध करून देत आहे. मनोज मेहेरच्या सामाजिक कार्याची सर्वत्र प्रशंसा याकरता होत आहे की मनोज मेहेरने आपल्या कार्याची कोठेही वाच्यता केली नसून फोटोसेशनही केलेले नाही. सोशल मिडियावरही याबाबत कोठे मनोज मेहेरने उल्लेख केलेला नाही. याउलट नवी मुंबईकरांचे फेसबुक उघडल्यास आपण काय केले याची राजकीय व सामाजिक घटकांकडून सोशल मिडियाच्या कुबड्या घेत जोरदार मार्केटींग केलेली पहावयास मिळत आहे. ही समाजसेवा आहे की प्रसिध्दीसाठी केलेले फोटोसेशन असा टीकेचा सूर आता नवी मुंबईकरांना आळविला जात आहे. नको तुमची समाजसेवा, पण आता हे फोटोसेशन सोशल मिडियावर टाकणे थांबवा असे नवी मुंबईकर आता उघडपणे बोलू लागले आहेत.
नेरूळमधील नगरसेवक सुरज पाटील स्वत: दुचाकीवर फिरून माईक व स्पीकरच्या माध्यमातून कोरोनाच्या विरोधात जनजागृती करत आहेत. भाजपचे गणेश भगत हे नेरूळमधील गोरगरीबांना धान्य व कचऱ्याचे डब्बे वाटत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे रतन मांडवे दुकानासमोर पांढरे पट्टे मारून ग्राहकांना अंतर ठेवण्यास सांगत आहे. बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या कोरोनाविरोधातील लढाईत सर्वात आघाडीवर असून सर्वात अगोदर त्या मैदानात उतरल्या आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यत प्रभागाप्रभागातील मतदारांशी स्वत: संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. दुकानदारांशी संपर्क करून अन्नधान्याचा साठा किती आहे, याची खातरजमा करत आहे. त्यांनी आपले आमदार म्हणून मिळणारे एक महिन्याचे वेतन यापूर्वीच पंतप्रधान निधीला मदत म्हणून जाहिर केले आहे. ज्येष्ठ नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी आमदार मंदा म्हात्रे करत असून कोरोनाविरोधात त्या सोशल मिडियाच्या माध्यमातूनही जनजागृती करत आहेत. तसेच एपीएमसीतील व्यापाऱ्यांशी संपर्क करून धान्याचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देत आहेत. व्यापाऱ्यांना अडचणी आल्यास आपणास सांगा, आपण थेट मंत्रालयात जावू, तुम्हाला सर्व सहकार्य मिळेल, मी सोबत आहे, पण तुम्ही नवी मुंबईकरांच्या धान्याची काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.
शिवसेनेचे सानपाड्यातील युवा नगरसेवक सोमनाथअण्णा वासकर यांनी सानपाड्यातील गोरगरीबांना धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंची चाळी, झोपड्या तसेच रस्त्यावर जावून मदत सुरू केली आहे. दिघा ते बेलापुरदरम्यान सर्वच राजकीय घटक रस्त्यावर उतरून नवी मुंबईकरांना मदत करत आहेत.