आश्विनी भोईर
मुंबई : ‘राज्यात सध्या सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे.
येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी
पुढे यावे आणि प्रशासनानेही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावे,’ असे आवाहन राज्याचे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.
‘करोना’च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक
लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील रक्तसाठ्याची
वस्तुस्थिती देखील सांगितली. ‘राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्याच्या ब्लड बँकेचे
प्रमुख थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडं केवळ सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा
शिल्लक आहे. रक्त दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. रक्ताचे आयुष्य फक्त ३५ दिवसांचे
असते. केवळ ‘करोना’च्या रुग्णांसाठी नव्हे, तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये गरजेचे असते.
थॅलेसिमिया, हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. रक्ताची जागा इतर कुठलेही
औषध घेऊ शकत नाही. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढे यावे,’ असे आवाहन टोपे यांनी केले.
‘संचारबंदीच्या काळातील सूचनांचे पालन करून सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत. जिल्हा व पोलीस प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे, नव्हे ते केलेच पाहिजे, असे टोपे म्हणाले. अर्थात, रक्तदान शिबिरे घेताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची काळजीही घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आजच्या एका दिवसात तब्बल १७ रुग्णांची भर पडली आहे. सांगलीतील १२ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, देशातील करोनाग्रस्तांचा आकडा ७००च्या पुढे गेला आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारनेही युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.